धाराशिव: धाराशिव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावीत शिकणाऱ्या अर्णव सोनवणे (वय १२) या विद्यार्थ्याचा आज दुपारी अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून शाळेतून घरी परतत असताना ट्रकने त्याला चिरडले.
अर्णव हा तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांचा मुलगा होता. सोलापूर-हैदराबाद महामार्गाला अंडरपास नसल्याने अर्णवला रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.शाळा सुटल्यानंतर सायकलवरून परतत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा संताप: या अपघातानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दीर्घकाळापासून या ठिकाणी अंडरपासची मागणी करण्यात येत असल्याचे,यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अपघाताला प्रशासन जबाबदार असल्याचे म्हणत नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोदार इंटरनॅशनल स्कूल सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नागरिकांच्या प्रतिक्रिया: अपघातानंतर संताप आणि चिंता
धाराशिव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ झालेल्या अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या काही प्रमुख प्रतिक्रिया:
- रॉंग साईड ड्रायव्हिंग: D Mart आणि पोद्दार शाळेपासून अनेकजण वरूडा रोड, बँक कॉलनी, जुना उपळा रोडकडे रॉंग साईडने जातात. सोलापूरकडून येणारी वाहने भरधाव वेगाने येत असल्याने अपघाताचा धोका वाढतो.
- शाळेसमोरील धोका: शाळेसमोरून रॉंग साईडने वाहने येत असल्याने शाळकरी मुलांना धोका निर्माण होतो.
- सर्व्हिस रोडची गरज: या भागात सर्व्हिस रोड नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सर्व्हिस रोडची तातडीने गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
- प्रशासनाविषयी नाराजी: अपघातानंतर प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
काही नागरिकांनी सोशल मीडियावरूनही आपला संताप व्यक्त केला आहे.
या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.