धाराशिव:– येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक हैदर अली शेख यांनी सहकारी शिक्षिकेला एअर लीडर बनविण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात आरोपीला मदत केल्याच्या आरोपाखाली पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी शनिवारी ही कारवाई केली.
हैदर अली शेख यांना अटक केल्यानंतर पोलिस कोठडी मागण्याऐवजी जांभळे यांनी न्यायालयीन कोठडी मागितली. जप्ती पंचनामा करताना व्हिडिओग्राफी करणे अनिवार्य असतानाही ते टाळले. तसेच, पीडित महिला, आरोपी आणि शाळेतील व लॉजवरील साक्षीदारांचे जबाबही नोंदवले नाहीत. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत घटनास्थळ पंचनामा करण्यात आला नाही. यासह अनेक त्रुटी तपासात आढळून आल्या. जांभळे यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी त्यांचे निलंबन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शिक्षिका २० ऑगस्ट २०२३ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच, याबाबत कुणाला काही सांगितल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. अखेर पीडित शिक्षिकेने ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ६४, ३५२, ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.