धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा विजय पाहायला मिळाला होता, मात्र तेव्हापासून परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत काडीमोड घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली, ज्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली.
२०१९ विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आणि बदललेले समीकरण
२०१९ च्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत भाजप-शिवसेना युतीची विजयी कामगिरी होती. तुळजापूरमधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील, परंड्यातून शिवसेनेचे तानाजी सावंत, धाराशिवमधून कैलास पाटील, आणि उमरग्यातून ज्ञानराज चौगुले हे आमदार निवडून आले होते. या विजयाने भाजप-शिवसेना युतीने धाराशिव जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, ज्याचा परिणाम स्थानिक राजकारणावर झाला.
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर परंड्याचे तानाजी सावंत, धाराशिवचे कैलास पाटील, आणि उमरग्याचे ज्ञानराज चौगुले हे सत्ताधारी बाकांवर गेले. मात्र, एकालाही मंत्रिपद मिळाले नाही, त्यामुळे नाराजी निर्माण झाली. तुळजापूरमधील भाजपचे आमदार राणा पाटील मात्र विरोधी बाकांवर बसले. पुढील अडीच वर्षांत शिवसेनेत पुन्हा बंडाचे वारे वाहू लागले, आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना दोन गटांत विभागली – एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट. या बंडामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला.
शिवसेनेतील बंड आणि सत्ता बदलाचे परिणाम
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून नवीन सरकार स्थापन केले आणि ते मुख्यमंत्री झाले. या नवीन राजकीय समीकरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटात सामील झाले, तर कैलास पाटील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिले. यामुळे जिल्ह्यातील सत्तेचे नवे रंग दिसू लागले. तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, पण राणा जगजितसिंह पाटील यांचे मंत्रीपदाचे स्वप्न अद्याप अपूर्ण राहिले.
शिवसेनेतील या विभागणीमुळे तुळजापूर, परंडा, धाराशिव, आणि उमरगा या चारही मतदारसंघांमध्ये सत्तासंघर्षाची नवी लाट निर्माण झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष आणि भाजपा यांच्यातील ताणतणाव यामुळे राजकीय रंगमंचावर अनेक नवे दावेदार आणि नेते पुढे येत आहेत.
लोकसभा निवडणुकीतील धक्का आणि नवीन मतभेद
मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली होती, पण त्यांचा पराभव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून तब्बल तीन लाख मतांच्या फरकाने झाला. हा पराभव राणा पाटील यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात अस्थिरता वाढली.
त्यानंतर काहीच दिवसांत तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी एक राजकीय भूकंप झाला. सावंत यांनी महायुतीचा उमेदवार आपल्याला मान्य नव्हता असे जाहीर केले, ज्यामुळे राणा पाटील आणि सावंत यांच्यातील मतभेद स्पष्ट झाले. या मतभेदांनी भाजप-शिंदे गटात निर्माण होणाऱ्या तणावाचे दर्शन घडवले.
धाराशिव मतदारसंघातील रस्सीखेच
धाराशिव मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना शिंदे गटाकडून जोरदार आव्हान मिळत आहे. शिंदे गटाने धाराशिव मतदारसंघावर दावा ठोकला असून तिथे तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, अनिल खोचरे, सूरज साळुंके, नितीन लांडगे, सुधीर पाटील, आणि शिवाजी कापसे असे अनेक दावेदार समोर आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध दावेदारांना दिलेली महत्त्वाची किंवा गौण वागणूक लक्षवेधी ठरली. परंड्यातील शासकीय कार्यक्रमात शिवाजी कापसे यांना पक्षात प्रवेश देणे, सुधीर पाटील यांच्या मेळाव्याला केवळ ३० मिनिटे हजेरी लावणे, जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांच्या कार्यालयास केवळ साडेतीन मिनिटांची भेट देणे, आणि नितीन लांडगे यांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हे सर्व घटनाक्रम राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. या वागणुकीवरून शिवसैनिकांच्या मनात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेत नव्याने आलेल्या सुधीर पाटील यांना जिल्हाप्रमुख म्हणून पुढे आणले जाईल का, याविषयीही तर्कवितर्क लावले जात आहेत. सुधीर पाटील यांचा उल्लेख वारंवार जिल्हाप्रमुख करण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्याच्या मनात सुधीर पाटील हेच जिल्हाप्रमुख म्हणून योग्य आहेत का ? असा प्रश्न पडला आहे.
निवडणुकीचे परिणाम आणि भविष्यकालीन दिशा
धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील हे सर्व घटनाक्रम दर्शवतात की, येणारी निवडणूक ही केवळ पक्षांच्या आणि नेत्यांच्या ताकदीची परीक्षा नसेल, तर मतदारांच्या भावनांचेही या निवडणुकीत महत्त्वपूर्ण स्थान असेल. जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तणाव, पक्षांतर, आणि नव्या नेतृत्वाच्या दाव्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.
भविष्यकालीन दिशा लक्षात घेता, शिवसेना, भाजप, आणि महाविकास आघाडी या तिन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेली रस्सीखेच ही धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाच्या पुढील प्रवासावर महत्त्वाचा प्रभाव टाकेल. विशेषतः तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील मतभेद, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतील अनिश्चितता, आणि नव्या दावेदारांच्या उभारणीमुळे आगामी निवडणूक राजकीय दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण ठरेल.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह