धाराशिव – श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी ५० लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता, हा उत्सव अत्यंत सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. भाविकांना उत्तम सोयीसुविधा पुरवण्यावर त्यांनी भर दिला.
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिर संस्थानच्या सभागृहात पालकमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
भाविकांच्या सोयीसाठी ५० नवीन बसेस
उत्सव काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा प्रवासी वाहतुकीसाठी ५० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली. १४ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे.
अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना:
पालकमंत्र्यांनी प्रशासनातील विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या:
- अखंडित वीजपुरवठा: उत्सव काळात २४ तास अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा.
- रस्ते दुरुस्ती: सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत.
- दिशादर्शक फलक: भाविकांच्या सोयीसाठी मराठी, कन्नड आणि तेलगू भाषेत दिशादर्शक फलक लावावेत.
- स्वच्छता व पार्किंग: नगर परिषदेने स्वच्छता आणि पार्किंगची योग्य व्यवस्था करावी.
- हिरकणी कक्ष: महिला आणि लहान मुलांसाठी चार ते पाच ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची निर्मिती करावी.
या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नवरात्र महोत्सवाच्या तयारीसाठी सोपवलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या प्रगतीची माहिती सादर केली.