परंडा : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीला परंडा तालुक्यातील लोणी शिवारात गाडी अडवून मारहाण करत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विलास लक्ष्मण केमदारणे (वय ४९, रा. लोणी, ता. परंडा, जि. धाराशिव, सध्या रा. इको सिटी, वह्राळे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते लोणी शिवारात असताना ही घटना घडली.
आरोपी युवराज नानासाहेब उमाटे, हनुमंत हरिदास मुळे, नानासाहेब उमाटे आणि इतर चार अनोळखी इसम (सर्व रा. अंजनगाव, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी त्यांची ईरटिगा कार (क्र. एमएच ०९ एफ जे ६४५४) फिर्यादी केमदारणे यांच्या गाडीला आडवी लावून रस्ता अडवला.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच, फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे चार तोळे वजनाची सोन्याची चेन, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या आणि ३५,००० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी विलास केमदारणे यांनी २६ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १२६(२), ११८(1), ११५(2), ११९(1), १८९(2), १९१(2), १९१(3), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.