(गावातल्या पारावर बसून चर्चा सुरू आहे)
पक्या: अरे, ऐकलं का रं भावड्या? आपलं परंड्याचं राजकारण लय गरमाटलंय बघा!
पेंद्या: (उत्साहाने) काय झालं रं पक्या? कुणाची विकेट पडली काय? का कुणी सिक्सर मारला?
पक्या: सिक्सरच म्हण की! आरं, आपले राहुलभैय्या मोटे… ज्यांनी मागल्या येळेला तुतारी फुंकली व्हती… त्येंनी आता तुतारी ठेवली बाजूला आन हातात घड्याळ बांधायचं ठरवलंय!
भावड्या: (तोंडातला तंबाखू थुंकत) घड्याळ? पण कुणाचं? पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून दोन घड्याळं झालीती की! एक काट्यावर चालणारं, आन एक बंद पडलेलं.
पक्या: (हसत) अरे, अजितदादांच्या गटाचं! म्हणजे आपल्या काकांच्याच गटात चाललेत भैय्यासाहेब! उद्या मुंबईत जाऊन पक्षप्रवेश करणार हायेत.
पेंद्या: आयला ! म्हणजे आता घरातलंच राजकारण! काकासोबत राहून भैय्यासाहेब धुरळा उडवणार तर! मग आता काय चिंताय?
भावड्या: चिंता नाय तर काय? पेंद्या, तू जरा डोस्कं चालव रं. आरं, राज्यात सरकार कुणाचं हाय? महायुतीचं. आपला आमदार कोण हाय? तानाजी सावंत. ते कुठल्या गटात हायत? शिंद्यांच्या शिवसेनेत. आता मोटे बी महायुतीतच आले की!
पक्या: बरोबर! भावड्याच्या डोक्यात बरोबर उजेड पडलाय. आरं, ज्या सावंतांनी मोटेंना दोनदा पाडलं, ज्यांच्याशी त्यांचं सापं-मुंगसाचं वैर हाय, आता तेच दोघं एकाच मांडवात बसून जेवण कसं करणार?
पेंद्या: खरंच की रं! म्हणजे आता सावंतांच्या बंगल्याच्या दारात ‘स्वागत’ म्हणून कमानी लावायची का ‘सावधान’ म्हणून पाटी लावायची, हेच कळंना की!
भावड्या: राजकारणात असं स्वागत-बीगत काय नसतंय. तिथं फक्त खुर्ची महत्त्वाची. दोघंबी एकाच ताटात जेवल्यासारखं दाखवतील, पण एकामेकाचा घास कसा काढून घ्यायचा, ह्याचंच गणित मांडतील.
पक्या: तेच तर! मागल्या येळेला भैय्याला फक्त हजार-पंधराशे मतानं हार पत्करावी लागली. आता काकांचा हात डोक्यावर आल्यावर जोर तर वाढणारच! पण सावंतांसारखा मुरलेला गडी बी गप बसणार नाय. तो काय कच्च्या गुरुचा चेला नाय.
पेंद्या: म्हणजे आता आपल्या परंड्याच्या आखाड्यात दोन पैलवान एकाच बाजूने लढणार, पण आतून एकामेकाचीच लंगोट ओढणार! लय मज्जा येणार राव!
भावड्या: मज्जा नाय रं पेंद्या… ह्याला राजकारण म्हणत्यात. आपली मतं घेऊन हे सगळे एकाच पंगतीत जाऊन बसत्यात. आपण फक्त पारावर बसून कुणाची विकेट पडली आन कुणी सिक्सर मारला, ह्याच्याच गप्पा हानत बसायचं! चल रं पक्या, च्या प्यायला.
(सगळे उठून चहाच्या टपरीकडे जातात)
– बोरूबहाद्दर