धाराशिव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळेच राहुल सोलापूरकरवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्त ते येथे उपस्थित होते. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
“राहुल सोलापूरकर हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आणि त्यांच्या टोळीतला माणूस आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणारच नाही. मुख्यमंत्र्यांनी एक टोळी बनवलेली आहे, ज्यामध्ये वकील आणि काही मोघम अभ्यासक सामील आहेत. हे सर्व स्वतःला साहित्यिक म्हणून मिरवतात,” असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. सरकारच्या आशीर्वादामुळेच सोलापूरकरवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुचाकी रॅली आणि शिवजयंती अभिवादन
धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीतही मनोज जरांगे पाटील सहभागी झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून राज्यातील आणि देशातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, “आजचा दिवस चांगला आहे, त्यामुळे नासक्या मंत्र्यांचे नाव घ्यायला नको,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.
‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी
राज्य सरकारने “छावा” हा चित्रपट करमुक्त करायला हवा, मात्र हा तिरस्काराचा भाग असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. “आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी हे सरकार तिरस्काराने भरलेले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आणि महादेव मुंडे प्रकरणाचा उल्लेख करत, “राज्यात अनेक हत्या झाल्या असून सरकारने योग्य पावले उचलली नाहीत,” असा आरोप केला.
यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील असे स्पष्ट करत, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.