धाराशिव: मंडळी, १ मे ची DPC बैठक म्हणजे जणू एका तिकिटात दोन पिक्चर! जिथे एका पडद्यावर २६८ कोटींच्या निधीवरून महाभारत सुरू होतं, तिथेच दुसऱ्या पडद्यावर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जोरदार रामायण घडलं!
झालं असं की, बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा उचलला. म्हणाले, “अहो, २२ आरोपी महिना झाला फरार आहेत, पोलीस काय करत आहेत? आणि मी यावर आवाज उठवला तर एका आरोपीचा भाऊ माझाच बाप काढतोय!” ओमराजेंचा पारा चढलेला असतानाच, भाजप आमदार राणा पाटील मध्ये पडले. म्हणाले, “अहो, राजकारण करून उगाच तुळजापूरला बदनाम केलं जातंय!” मग काय विचारता, दोघांमध्ये अशी काही ‘तू तू-मैं मैं’ जुंपली की विचारायची सोय नाही!
पण खरी कॉमेडी तर बैठकीनंतर झाली!
बैठकीतून बाहेर आल्यावर मीडियाने राणा दादांना गराडा घातला. दादांनी माईक हातात घेतला, सुरुवातीला जिल्ह्याच्या हिताच्या, जबाबदार पत्रकारितेच्या गप्पा मारल्या. तुळजापूरचं नाव कसं उगाच घेतलं जातंय यावर खंत व्यक्त केली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण मग अचानक दादांची गाडी सुसाट सुटली आणि थेट कळंबच्या स्टॉपवर जाऊन थांबली!
म्हणाले, “आता परंडा बघा, कोण नाव घेतंय का? कळंब बघा, कोण नाव घेतंय का?” मग टीव्ही चॅनलच्या पत्रकारांकडे वळून म्हणाले, “कळंबची माहिती तुम्हाला माहिती असताना पोलिसांनी दिली नाही!” (हे लॉजिक पत्रकारांनाही कळलं नाही म्हणे!). आणि मग सोडला एकदम ‘ब्रह्मास्त्र’ टाईप बॉम्ब! दादा गरजले, “खरं तर कळंबच्या पत्रकारांची नार्को टेस्टच केली पाहिजे!”
काय??? नार्को टेस्ट? पत्रकारांची? कशासाठी?
हे ऐकून तिथे उपस्थित पत्रकार (विशेषतः कळंबवाले!) नुसते थिजले. एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. विषय चालला होता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा, वाद झाला होता ओमराजेंशी, आणि दादा थेट कळंबच्या पत्रकारांच्या नार्को टेस्टवर कसे पोहोचले, हे कुणालाच कळेना!
आणि यातला ट्विस्ट ऐका!
दादा ज्या कळंबच्या पत्रकारांवर घसरले, ती मंडळी म्हणजे जिल्ह्याच्या बातम्या मुंबईच्या मोठ्या चॅनल्सपर्यंत पोहोचवणारे मुख्य ‘शिलेदार’! न्यूज १८ चे बालाजी निरफळ, एबीपी माझाचे आप्पा शेळके, झी २४ तासचे ज्ञानेश्वर पतंगे, साम मराठीचे बालाजी सुरवसे, एनडीटीव्हीचे ओंकार कुलकर्णी… हे सगळे पत्रकार कळंबचेच रहिवासी! म्हणजे दादांनी चुकून मधमाश्यांच्या पोळ्यावरच दगड मारला की काय, अशी कुजबुज आता सुरू झालीये! (फक्त टीव्ही ९ चे श्रीराम क्षीरसागर आणि लोकशाहीचे काका कांबळे हे धाराशिवचे, तर पुढारीचे रहीम शेख हे तुळजापूरचे आहेत, ही अधिकची माहिती!)
निष्कर्ष: तर मंडळी, धाराशिवच्या राजकारणाची ही सिरीज आता क्राईम, सस्पेन्स, कॉमेडी अशा सगळ्या जॉनरला स्पर्श करत आहे. DPC निधी, भाऊबंदकी, इस्तीफा ऑफर, हुकलेलं उपोषण आणि आता हे नार्को टेस्ट प्रकरण! आता कळंबचे पत्रकार यावर काय भूमिका घेणार? राणा दादा ‘सॉरी’ म्हणणार की आणखी काही नवीन ‘खुलासा’ करणार? तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे आरोपी कधी सापडणार? अनेक प्रश्न आहेत, उत्तरं मात्र… वेट अँड वॉच!
Video