धाराशिव – उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे यांच्या निलंबनाच्या कार्यवाहीने मोठा वाद निर्माण केला आहे. त्यांच्या निलंबनामागील कारणांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकरीपुत्र अण्णासाहेब दराडे यांनी या प्रकरणावर भाष्य करत संजयकुमार ढवळे यांच्या निलंबनामागे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
दराडे म्हणाले, “संजयकुमार ढवळे यांनी दप्तर तपासणीसारख्या कर्तव्यनिष्ठ गोष्टी केल्या. मात्र, त्यांच्याविरोधात आंदोलन घडवून आणले गेले आणि आता निलंबनाची कार्यवाही केली गेली आहे. यामागे नेमके काय दडलेले आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.”
त्यांनी भ्रष्टाचारी लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देऊन प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्याय होणे म्हणजे कायद्याला धाब्यावर बसवण्यासारखे आहे,” असे दराडे म्हणाले.
दराडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांवर होत असलेल्या कारवायांविरोधात स्थानिक स्तरावरही तीव्र संताप व्यक्त होत आहे.दराडे यांनी या घटनेचा पाठपुरावा करून न्याय मिळवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.