धाराशिव मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीचा ढोल वाजू लागला आहे आणि हे राजकारणाचं वादळ इतकं जोरात आहे की, मतदारांनी छत्र्या धराव्यात की कानात बोळे घालावेत असा प्रश्न निर्माण झालाय! विद्यमान आमदार कैलास दादांच्या खुर्चीवर नजर ठेवून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांची अवस्था काहीशी ‘अगोदर तुला, मग मला’ या बिन तोंडाच्या खेळासारखी झालीय.
कैलास दादांची कहाणी म्हणजे साक्षात ‘राजकीय पर्यटन’! त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात राष्ट्रवादीत केली, पण तिथं गोरे दादाजींनी त्यांना झेडपी निवडणुकीत डावलून स्वतःच्या मुलाला तिकीट दिलं. झालं! कैलास दादा फुल्ल टेन्शनमध्ये आले आणि सरळ शिवसेनेच्या अंगणात उडी घेतली. शिवसेनेचे खासदार ओमदादांनी कैलास दादांना जिल्हाप्रमुख बनवलं आणि पुढं २०१९ मध्ये विधानसभेचं तिकीटही दिलं. या तिकिटाचं नशीब एवढं जोरात होतं की, कैलास दादा आमदारपदावर विराजमान झाले आणि ओमदादा व कैलास दादा ‘जय- विजय’ जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली.
मात्र, राजकारणात काहीही स्थिर राहत नाही. शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी झालेली फूट आणि एकनाथ भाईंचं वेगळी ‘चूल’ मांडणं यामुळे सगळं सापशिडीच्या खेळासारखं उलटलंय. कैलास दादा पहिल्यांदा शिंदे गटाकडं झुकले, पण अचानक ‘यु-टर्न’ घेत मातोश्रीवर परतले. उद्धव साहेबांनी त्यांचा गौरव करत ‘माझा वाघ’ अशी स्तुती केली, आणि कैलास दादा पुन्हा एकदा मातोश्रीच्या गोटात सन्मानानं स्थिरावले.
पण आता प्रश्न आहे कैलास दादांच्या विरोधकांचा ! शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये धाराशिवसाठी तिकीट कोणाला मिळणार यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटात तिकीटासाठी अनिल भाऊ, नितीन भाऊ, सूरज भाऊ देव पाण्यात ठेवून तिकीटाच्या आशेने बसलेत, पण खरी कॉम्पिटिशन शिक्षण सम्राट सुधीर आण्णांची आहे. त्यांनी साक्षात मुख्यमंत्री एकनाथ भाईंना धाराशिवला बोलावून फिल्डिंग लावलीय, म्हणजे तिकीटाची स्पर्धा आणखी रंगली आहे.
आणखी एक धक्का म्हणजे कळंबचे आप्प्पा! त्यांची स्ट्रॅटेजी तर आणखी भन्नाट! शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंड्यात आले होते आणि आप्प्पांनी तब्बल २०० गाड्यांचा ताफा गोळा करून शक्तिप्रदर्शन केलं. कार्यकर्त्यांनी इतका गोंधळ घातला की सगळी मदार एकदम रोमांचक वाटली, पण सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडमनी आप्प्पाचं नाव नीट घेतलं नाही! त्यामुळे कार्यकर्त्यांचं उरलंसुरलं जोशही आटला. आप्पा आता तिकिटासाठी शिंदे गटात आहेत, पण तिकीट मिळणार का, यावर एकच मत आहे: ‘प्रा. ड्रॉ. सावंत साहेबांचं’. ते तर पुतण्या धनंजयला धाराशिवच्या रणांगणात उतरवायच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आप्पांच्या तिकिटाच्या भविष्यावर अजून गूढता आहे.
भाजपकडं मात्र तितकंच गहजब सुरू आहे. नितीन भाऊ आणि दत्ता भाऊ यांनी मतदारसंघाचा एक-एक कोपरा पिंजून काढला आहे. पण महायुतीमध्ये धाराशिवची जागा शिंदे गटाला मिळणार की भाजपला, याचं उत्तर अजून गुलदस्तात आहे. दोन्ही पक्षांचं रिंगण तयार झालंय, पण फाटलेली तिकीटं कोणाच्या खिशात पडणार, हे निवडणूक आयोगालाच कदाचित माहिती असेल.
धाराशिवच्या या निवडणुकीचा तमाशा पाहताना मतदारांचं मनोरंजन पुरतं झालंय. राजकीय नेत्यांचे हे फुल टू ड्रामा चालूच राहणार, पण शेवटी राजकारणात ‘नशीब बलवत्तर’ असलं की सगळे डाव जिंकले जातात. आता बघायचं की, कोणाचं नशीब जोरात असेल आणि कोण राजकारणाच्या या महाभारतात अर्जुन ठरेल!
– बोरूबहाद्दर