नळदुर्ग : उमरगा – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडी टोलनाक्याच्या पुढे वाहने आडवून लूटमार करण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील ३० दिवसात पाच ते सहा घटना घडल्या असून, नळदुर्ग पोलीस थंड बसल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहे.
उमरगा – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज शेकडो वाहने जातात. रात्रीच्या वेळी हमरस्त्यावर काही दरोडेखोर उभे राहून वाहने अडवत आहेत आणि प्रवाश्याना मारहाण करून, पैसे, सोने असा ऐवज लूटत आहेत. मागील काही दिवसात पाच ते सहा घटना घडल्या असताना, नळदुर्ग पोलीस मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे वाहनचालकाना या मार्गावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
ताजी घटना
फिर्यादी नामे- अनिल विजय हुल्ले, वय 35 वर्षे, रा. सम्राट चौक बुधवार पेठ सोलापूर ता. द. सोलापूर जि. सोलापूर हे दि.05.01.2024 रोजी 15.00 वा. सु. महालक्ष्मी देवीचे दर्शन करुन कुटुंबासह सोलापूरकडे जातम असताना नळदुर्ग ते सोलापूर जाणारे एनएच 65 रोडवर फुलवाडी टोलनाक्याच्या पुढे अनोळखी 08 ते 10 इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात कुह्राड, लोखंडी रॉड, दगड घेवून फिर्यादीची गाडी क्र एमएच 13 ईएफ 2255 आडवून गाडीवर हल्ला करुन गाडीची पाठीमागील काच फोडून गाडीचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनिल हुल्ले यांनी दि.07.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 341, 427, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हे सर्व दरोडेखोर असून, रस्त्याच्या कडेला झाडामागे दबा धरून बसतात. वाहने आल्यानंतर त्यांच्यासमोर उभे राहतात. अपघात होईल या भीतीने लोक थांबतात तेव्हा दबा धरून बसलेले दरोडेखोर येऊन , लूटमार करतात. पोलीस मात्र दरोड्याची तक्रार न नोंदवता, मारहाणीची तक्रार नोंदवून मोकळे होत आहेत. त्यामुळे नळदुर्ग पोलिसांच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.