धाराशिव : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, वारंवार मागणी करूनही त्या पूर्ण न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रलंबित थकबाकी आणि वाढीव वेतनाच्या थकबाकीत खंड पडू नये, यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने ५ मार्च रोजी राज्यातील सर्व एसटी आगार आणि विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. धाराशिव आगार गेटसमोरही संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले.
कामगारांना २०१८ पासूनची महागाई भत्ता थकबाकी मिळावी, असा आदेश न्यायालयाने दिला असला तरी अद्याप ती रक्कम मिळालेली नाही, अशी माहिती विभागीय सचिव शरद राऊत यांनी दिली. तसेच, २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीतील घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराची थकबाकी मिळणे आवश्यक आहे, परंतु ती मिळालेली नाही, असे आगार सचिव तात्यासाहेब रणखांब यांनी सांगितले.
कामगारांना मिळणाऱ्या वाढीव थकबाकीची रक्कम कायम राहावी आणि सर्व प्रलंबित थकबाकी वेळेत मिळावी, अशी मागणी संघटनेचे प्रतिनिधी राजेश काशीद यांनी केली. तसेच, कामगारांच्या सर्व आर्थिक मागण्या सोडवाव्यात, अशी विनंती सचिन लोमटे यांनी राज्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना केली.
या आंदोलनात मधुकर अनभुले, आगार अध्यक्ष बालाजी पाटील यांच्यासह अनेक कर्मचारी, संघटनेचे सभासद आणि प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.