तुळजापूर: तुळजापूर शहराच्या बाहेरील भागात बार्शी रोड येथे झालेल्या शेतकरी सत्तार यासीन इनामदार (रा. सिंदफळ) यांच्या खून प्रकरणाचा तातडीने तपास करून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.
तपासाची गतीमान कारवाई: आरोपी २४ तासांत गजाआड
काल (५ मार्च २०२५) रोजी सत्तार इनामदार यांचा अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडने डोक्यात वार करून खून केल्याची माहिती मिळाली. घटनेची गंभीर दखल घेत तुळजापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान, मुख्य संशयित समाधान संपत शिंदे (रा. धारूर) हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कागल येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, या हत्येत सामील असलेला दुसरा आरोपी गणेश घाटशिळे (रा. सिंदफळ) यालाही तुळजापूर परिसरातून अटक करण्यात आली. या तातडीच्या कारवाईमुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची मेहनत
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही मोहिम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, सपोफौ वली उल्ला काझी, पोलीस हवालदार विनोद जानराव, शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, दयानंद गादेकर, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी, अशोक कदम, सुनील मोरे , चालक मेहबूब अरब, रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांनी केली.
या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.