धाराशिवमध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट वाढला आहे, आणि त्याला पाठबळ मिळतेय थेट तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीकडून, हेच अधिक चिंतेचं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी मदत गोळा करण्याच्या नावाखाली आशिष विशाळ नावाच्या तुमच्या “सहकाऱ्याने” शहरात खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. हा गुन्हेगार स्वतःला तुमचा खासगी पीए सांगत फिरायचा आणि सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देत होता.
तुमच्या शब्दांना किंमत आहे का? की तुम्हीही संभ्रमात आहात?
काही दिवसांपूर्वीच जरांगे समर्थकांनी आशिष विशाळला भररस्त्यात चोप दिला होता. त्यावेळी तुम्ही मोठ्या आवाजात म्हणाला होतात – “याला आणखी तुडवा!” इतकी संतप्त प्रतिक्रिया देणारे तुम्ही, आता अचानक १२ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात त्याला तुमचा ‘सहकारी’ म्हणताय!
हा यू-टर्न का? की खरं बोलायची हिंमतच नाही?
जर आशिष विशाळ तुमचाच माणूस असेल, तर स्पष्ट सांगा –
- धाराशिवमध्ये तो कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करत होता?
- त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफडी, १८ लाखांची गाडी आली कुठून?
- नोकरी नाही, जमीन नाही, उत्पन्नाचा स्त्रोत नाही, मग एवढे पैसे त्याच्याकडे आले कुठून?
या प्रश्नांची उत्तरं तुमच्या “सहकाऱ्याला” द्यावी लागतील, आणि तीही प्रशासनासमोर!
प्रश्न विचारणाऱ्यांना धमक्या – लोकशाहीत चालणार नाही!
यावरून तुमची अस्वस्थता वाढली आहे हे स्पष्ट आहे. कारण धाराशिव लाइव्ह आणि इतर पत्रकारांनी ही सत्ये बाहेर काढली म्हणून तुम्हाला अस्वस्थ वाटतेय. त्यामुळे तुम्ही आता पत्रकारितेवरच हल्ला चढवायचा प्रयत्न करताय. धाराशिव लाइव्हला RNI प्रमाणपत्र आहे का, नसतं का, अशी चौकशी करताय. पण तुम्हाला एवढंही कळत नाही की वेब पोर्टलसाठी RNI प्रमाणपत्र लागत नाही!
तुम्ही पत्रकारांना धमकावू शकता, पण आम्ही घाबरणार नाही! आम्ही आमच्या पत्रकारितेच्या नोंदी केंद्र सरकारच्या PIB (Press Information Bureau) कडे केल्या आहेत. त्यामुळे तुमच्या “तपासाचा” आम्हाला धाक नाही.
सत्य बाहेर काढणं हा गुन्हा असेल, तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करू!
तुम्हाला वाटत असेल की, आम्ही गप्प बसू, तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. धाराशिव लाइव्ह आणि इतर निर्भीड पत्रकार सत्य मांडत राहणार! जर खंडणीखोरांना वाचवण्याचा तुमचा इरादा नसेल, तर तुम्हीच ACB मार्फत आशिष विशाळच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी का करत नाही?
की तुम्हालाही सत्य बाहेर येण्याची भीती वाटते?
लोकप्रतिनिधी म्हणून खरं बोलायची हिंमत ठेवा, नाहीतर गप्प बसा! कारण धाराशिवमधील जनता आता डोळस झाली आहे. सत्य लपवता येणार नाही, आणि पत्रकारांचा आवाज दडपता येणार नाही!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह , मो. 7387994411