धाराशिव – काही दिवसांपूर्वी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एका जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार आपल्याला मान्य नव्हता,त्यामुळे आपण प्रचारात सक्रिय सहभागी झालो नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
“मुद्याचं बोलू “ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, “तानाजी सावंत यांनी मला लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रचार करण्याचे आश्वासन दिले होते. ते काय बोलले याची मला माहिती नाही, पण जेव्हा ते मला भेटतील, तेव्हा ते मला नक्कीच सांगतील.” सावंत यांच्या या वक्तव्यामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पाटील यांनी काहीशी शांत करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बोलताना आ. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सौ. अर्चना पाटील यांचा पराभव का झाला, याचे कारण देखील स्पष्ट केले. “लोकसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम, आणि दलित मतदारांचा फटका बसला. विशेषत: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, आणि त्याचा पराभवात मोठा वाटा होता,” असे पाटील म्हणाले. त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तातडीने आणि प्रभावीपणे हाताळण्याची गरज असल्याचेही सूचित केले.
आगामी विधानसभा निवडणुकांबाबत विचारले असता, “तुळजापूर ऐवजी आपण धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे,” असे पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, “राजकारणात काहीही होऊ शकते, आणि कोणत्याही गोष्टीचे निश्चित उत्तर देणे कठीण आहे. आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचा निर्णय योग्य वेळ आल्यावर घेण्यात येईल.”
मुलाखतीत पाटील यांना आणखी काही व्यक्तिगत आणि राजकीय प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये राजकीय विरोधक खा. ओमराजे निंबाळकर यांचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे का, असा प्रश्न विचारला असता, पाटील यांनी “कल्पना नाही,” असे उत्तर दिले.
शेवटी, राजकीय वारसदार मल्हार की मेघ यापैकी कोण असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, “राजकीय वारसा हक्काने मिळत नाही, ज्याला आवड असेल आणि ज्याच्यात क्षमता असेल, तोच पुढे येईल.” त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढी कोण पुढे येईल याबाबतची चर्चा अधिकच वाढली आहे.