धाराशिव – पहिल्या जोडीदाराशी कायदेशीर फारकत न घेता दुसरा विवाह केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. दोघांनीही चार विवाह करण्याच्या धार्मिक अधिकाराचा दावा करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचलित नियमांमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
तुळजापूर तालुक्यातील रायखेल येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका यांनी अद्याप निलंबनाचे आदेश मिळाले नसल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
शिक्षकाच्या पहिल्या पत्नीने या कारवाईची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सुनावणी घेतली. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तन नियम १९६७ कलम २० (१), (२) नुसार त्यांनी निलंबनाची कारवाई केली.दरम्यान, संबंधित शिक्षक आणि शिक्षिकेला अन्य तालुक्यातील गट शिक्षण कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिक्षकाच्या पहिल्या पत्नीने आपल्याला एक मुलगी असतानाही पतीने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्यामुळे आपल्या मुलीचा हक्क हिरावला गेला असल्याचे सांगितले. ती दररोज वडिलांची वाट पाहत असते. आपल्यावर अन्याय झाल्यामुळे आपण शिक्षक पतीवर कारवाईसाठी लढा देत असून आता दोघांनाही बडतर्फ करण्यासाठी लढणार असल्याचे तिने म्हटले आहे.
– तक्रारदार पत्नी