धाराशिव – येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील नंदकिशोर क्षीरसागर यांनी शाळेच्या फी वसुलीच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, शाळेची पूर्ण फी भरली असतानाही त्यांच्या मुलाला शाळेच्या बस मधून उतरवण्यात आले आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या घटनेनंतर मुलाचे वडील शाळेत गेले असता त्यांनाही अपमानित करण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या संस्थापक अध्यक्ष व सचिव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
फी भरणा केला तरीही विद्यार्थ्याला बस मधून उतरवले
तक्रारीनुसार, नंदकिशोर क्षीरसागर यांचा मुलगा ओमकार हा शाळेच्या नियमानुसार पूर्ण फी भरूनही 30 जुलै 2024 रोजी शाळेच्या बस मध्ये बसला असता त्याला शाळेचे मुख्याध्यापक बाराते यांनी अपमानास्पद वागणूक देत बस मधून उतरवले. या घटनेमुळे मुलगा घरी रडत आला.
पालकांनाही अपमानित केल्याचा आरोप
या घटनेनंतर नंदकिशोर क्षीरसागर हे शाळेत गेले असता प्राचार्या साधना नितीन भोसले यांनीही त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. फी भरणा केला असल्याचे सांगूनही त्यांना “फीस भरणेहोत नसेल तर कशाला मुलाला आमच्या शाळेत घालता?” असे म्हणत अपमानित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तक्रार
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नंदकिशोर क्षीरसागर यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) कार्यालयात तक्रार दाखल करून शाळेच्या संस्थापक अध्यक्ष व सचिव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.