धाराशिव – भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले होते. सुमारे 2.5 वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती, तेव्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या करीता शासकीय दूध शितकरण केंद्राची जागा का दिली नाही ? त्याकाळात शिवसेनेचे आमदार कैलास पाटील गोट्या खेळत होते का ? असा संतप्त सवाल भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे.
भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याने महायुती सरकारने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या करीता शासकीय दूध शितकरण केंद्राची एक एकर जागा देवून खऱ्या अर्थाने त्यांच्या जयंती दिनी अभिवादन केले आहे. राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले.
ठाकरे सरकारच्या काळात मात्र जिल्ह्याला सापत्नीक वागणूक मिळाली. जिल्ह्यातील एकाही प्रकल्पाला निधी देण्यात आला नाही. पीक विम्या सारख्या शेतकऱ्यांच्या संवेदनशील विषयावर यांना साधी बैठक लावता आली नाही.
याउलट महायुती सरकारने जिल्ह्यातील अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले. जिल्ह्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. रेल्वे, वैद्यकीय महाविद्यालय, वर्ग – 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर, धाराशिव शहरातील रस्त्यांसाठी रु. 150 कोटी निधी, कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची ऊंची वाढविण्यासाठी निधी यासारखे अनेक विषय मार्गी लावले आहेत. महायुती सरकारच्या निर्णयक्षम कारभाराने यांची पोटदुखी होत आहे. स्वतः च कर्तृत्व शून्य व दुसऱ्याने केलेलं पाहवत नाही.
लोकशाहीर अण्णाभाऊ आमच्या हृदयात आहेत, आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे स्मारक उभारण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केला याचे समाधान आह,असेही काळे म्हणाले .