धाराशिव – तेर शिवारात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेत, सोमनाथ शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फुलचंद पसारे, खुडू भक्ते, दादा पसारे, धनाजी भक्ते, सोमनाथ सौदागर, राजेंद्र पसारे, बाळा शिंदे, हरी भक्ते, नवनाथ पसारे आणि इतर तिघांनी त्यांना, त्यांच्या आईला आणि मेहुण्याला शिंदे यांच्या शेतात मेंढ्या चारल्याच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्यांनी, दगड आणि काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच अनिल कुचेकर यांच्या खिशातील २५,६०० रुपये आणि विवो मोबाईल चोरून दुसऱ्या मोबाईलचा डिस्प्ले फोडला.
दुसऱ्या घटनेत, राजेंद्र पसारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमनाथ शेळके, बायडाबाई शेळके, अनिल कुचेकर, मनिषा कुचेकर आणि इतर पाच जणांनी त्यांना, त्यांच्या भावाला आणि पुतण्याला नवनाथ नाईकवाडी यांच्या कांद्याच्या रिकाम्या शेतात झालेल्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्यांनी, काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच राजेंद्र पसारे यांच्या हातातील ५ ग्रॅमची अंगठी आणि दादासाहेब पसारे यांच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले.
दोन्ही गटांनी एकमेकांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ढोकी पोलिसांनी दोन्ही तक्रारींची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.