धाराशिव – महायुती सरकार जनतेच्या हिताचे आहे. मागील अडीच वर्षांच्या काळात जिल्ह्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय झाले आहेत. ठाकरे सरकारने रखडविलेल्या जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्पांना महायुती सरकारने बळ दिले आहे. हे आपल्या हक्काचे, आपल्या विचाराचे सरकार असल्यामुळे जिल्ह्याचा कायापालट करणार्या जवळपास सर्वच प्रकल्प आणि योजनांना पर्याप्त निधी मिळाला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, निम्न तेरणाच्या दुरूस्तीसाठी घेतलेला विशेष निर्णय, कौडगाव, तामलवाडी एमआयडीसी, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे स्मारक, अशी कितीतरी मोठी यादी सांगता येईल. आपल्या व्यापक हिताची काळजी घेणार्या महायुती सरकारलाच आपण सर्वांनी ताकद द्यायला हवी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील चिखली चौरस्ता येथे शुक्रवारी तेर-तुळजापूर आणि बार्शी हद्द – बोरफळ या एकूण 90 किलोमीटर रस्त्याच्या 625 कोटी रूपयांच्या दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या वाट्याला सातत्याने आर्थिक अडचणी येत होत्या. त्यातून मार्ग काढण्यासाठी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेब यांनी सन 2001 साली मोठा क्रांतिकारी निर्णय राजकीय वर्चस्व पणाला लावून घेतला. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 11 हजार 700 कोटी रूपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर अखेरीस आपल्या हक्काचे पश्चिम महाराष्ट्रातील पाणी जिल्ह्यात दाखल होत आहे. त्याकाळी जिल्ह्यात केवळ तेरणा हा एकमेव साखर कारखाना होता. ऊस कमी पडल्यावर कर्नाटकातून ऊस गाळपासाठी आणावा लागत असे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या सिंचनाच्या मुलभूत कामामुळे आजघडीला जिल्ह्यात 30 पेक्षा अधिक साखर कारखाने आणि गूळ पावडर युनीट आहेत. उसाच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे. ही सर्व किमया डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या कामाची असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.
जे ठाकरे सरकारला जमले नाही, ते मागील अडीच वर्षात आपल्या महायुती सरकारने करून दाखविले आहे. पर्यटन, उद्योग, कृषी, सिंचन, अशा विविध क्षेत्रात भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. तुळजाभवानी मंदिरातील 60 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. नवरात्रोत्सवानंतर हे काम सुरू होईल. संपूर्ण दगडी मंडप उकलून पुन्हा हे सगळे दगड व्यवस्थित बसविले जाणार आहेत. दोन हजार कोटींंची गुंतवणूक तुळजापुरात केली जाणार आहे. तिरूपती बालाजीच्या धर्तीवर तुळजापूर शहरात आलेल्या पर्यटक आणि भाविकांच्या माध्यमातून दहा हजाराहून अधिक रोजगार निर्मितीचे आपले उद्दिष्ट आहे. कौडगाव एमआयडीसीतून दहा हजार मुलांना काम मिळणार आहे. तामलवाडीत सोलापूर येथील 150 उद्योजक गुंतवणुकीस तयार आहेत. तेथेही बारा हजार रोजगाराचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले आहे आणि या सर्व प्रयत्नांना महायुती सरकारने मान्यता मंजुरी देवून जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपल्याला मोठे बळ दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
निम्न तेरणाच्या 112 कोटी रूपयांच्या दुरूस्ती कामाला मान्यता मिळाली आहे. नळदुर्ग येथे पाच कोटी रूपयांच्या निधीतून बसवसृष्टी साकारली जाणार आहे, वसंतनगर येथे वसंतराव नाईक स्मारक, नळदुर्ग आणि धाराशिव येथील शादीखान्यासाठी भरीव निधी दिलेला आहे. अहिल्यादेवींच्या स्मारकाचे कालच भूमिपूजन केले. तुळजापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारला जाणार आहे. 50 कोटी रूपयांचे प्रशिक्षण केंद्र हा सर्वात महत्वाचा प्रकल्प आपण सुरू करीत आहोत आणि आता संत गोरोबा काका यांचे तेर तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राशी जोडणार्या या रस्त्याचेही आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले आहे. लवकरात लवकर या भागातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेवून अत्यंत दर्जेदार पध्दतीने हे काम पूर्ण करावे, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले.
येडशी-लातूर चौपदरीकरणासाठी साडेचारशे कोटी
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या येडशी-लातूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न आता निकाली निघाली आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. पहिल्या टप्प्यातील ३७.५२५ किलोमीटर अंतराची निविदा जाहीर करण्यात आली आहे. साडेचारशे कोटी रुपयांतुन येडशी ते लातूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ चे चौपदरीकरण आता लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांची रखडलेल्या कामामुळे होत असलेली गैरसोय आता कायमची दूर होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी नितीन काळे, सुधाकर गुंड गुरुजी, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, अनंतराव देशमुख, उद्धव पाटील, राजाभाऊ पाटील, नारायण ननवरे, प्रशांत रणदिवे, अमर बाकले, भारत डोलारे, कुंद पाटील, तेजस सुरवसे, दुष्यंत चोबे, सिद्धेश्वर गवळी, बालाजी गावडे, तानाजी गायकवाड, वेंकट पाटील, झुंबर बोडके, संगमेश्वर स्वामी, गणेश घोगरे, शाम सारोळकर, ज्ञानेश्वर जंगाले मुराद पठाण, महेश लांडगे, काका शेलार, नागप्पा पवार यांच्यासह चिखली व परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.