तेरखेडा – येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात आठ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी घडली. छोटुमिया मियासाहेब दारुवाले यांच्या मालकीच्या ‘बाबा फायर वर्क्स’ या फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि नियमांचे पालन न करता स्फोटके साठवल्याने तसेच निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे स्फोट घडल्याचा आरोप आहे.
या स्फोटात अभिजीत संभाजी गायसमुद्रे (वय 30), शारदा राजेंद्र ओव्हाळ (वय 46), जालिंदर जर्नाधन ओव्हाळ (वय 50), मंजुषा जालिंदर ओव्हाळ (वय 45), शोभा मधुकर करडे (वय 40), साखरबाई मोहन गांधले (वय 60), चंद्रकांत उद्धव घाटुळे (वय 48), अनिल माणिक तोरडमल (वय 27) आणि सोनाली अभिजीत गायसमुद्रे (वय 23) हे सर्व रा. कडकनाथवाडी ता. वाशी जि. धाराशिव कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिस हवालदार विशाल रमेश गायकवाड यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, कारखान्याचे मालक छोटुमिया दारुवाले यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 223, 288, 125 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, फटाक्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.