येडशी – येडशी अभयारण्यात काही दिवसांपासून एका अनोळखी पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून एक शाही वाघ आहे! हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे वनविभाग सतर्क झाला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
वाघाचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वनक्षेत्रात १५ ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेरे सतत कार्यरत राहण्यासाठी त्यातील सेल दररोज बदलण्यात येत आहेत. शनिवारी (दि. २९) वन व वन्यजीव विभागाच्या पथकाला वाघ मात्र आढळून आला नाही.
वाघाला पकडण्याचे आदेश नाहीत, तो परत जाईल असा अंदाज
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाघाला पकडण्याचे कोणतेही आदेश नाहीत. वाघ आलेल्या मार्गाने परत जाण्याची शक्यता असून तो ८ ते १० दिवसांपूर्वी येडशीत आल्याचा अंदाज आहे.
सांबर हरीण, उत्तम परिसंस्था हे येडशीत येण्याचे कारण?
येडशी अभयारण्यात सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर यासारखे प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. सांबर हे वाघाचे आवडते भक्ष्य असल्याने वाघ येडशीत आल्याचा अंदाज वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दीड वर्षापूर्वी सांबर हरीण येडशी अभयारण्यात आढळल्याची नोंद आहे. येडशी अभयारण्यातील समृद्ध जैवविविधता आणि मुबलक खाद्य वाघाला आकर्षित करण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांमध्ये भय, आमदार कैलास पाटलांची वाघ जेरबंद करण्याची मागणी
वाघाच्या आगमनाने येडशी परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे आधीच भयभीत असलेले शेतकरी आता वाघाच्या भीतीने त्रस्त आहेत. वाघाला जेरबंद करून त्याच्या मूळ अधिवासात सोडावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
टिपेश्वरचा वाघ कसा ओळखला?
प्रत्येक अभयारण्यातील वाघाला अंगावर विशिष्ट प्रकारचे पट्टे असतात. या पट्ट्यांचा नमुना प्रत्येक वाघासाठी वेगळा असतो आणि त्यावरून त्याची ओळख पटवता येते. येडशीत आढळलेल्या वाघाच्या पट्ट्यांच्या नमुन्यावरून तो टिपेश्वर अभयारण्यातून आल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
वाघाच्या येण्याने येडशी अभयारण्याचे महत्व अधोरेखित
वाघाचे येडशीत आगमन हे येथील जंगलाच्या आरोग्याचे आणि समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च भक्षक असल्याने त्याचे अस्तित्व हे परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्वाचे आहे.