उमरगा – उमरगा तालुक्यातील तुरोरी गावाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकचालकाला दुचाकीस्वाराने मारहाण केल्याची घटना १५ जानेवारी रोजी घडली.
समद जैनोद्दीन रामपुरे (वय २९, रा. दाळींब) हे ट्रक क्र. के.ए.२२ सी २५५२ ने दाळींब ते हैद्राबाद असा प्रवास करत होते. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तुरोरी गावाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी हॉर्न वाजवला. यावरून संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने रामपुरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील लाकडी काठीनेही वार केले. यात रामपुरे जखमी झाले.
रामपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
कार्ला येथे मारहाणीचा गुन्हा दाखल
नळदुर्ग: कार्ला येथे मागील भांडणाचे कारणावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी दशरथ देवकर रा. कार्ला यांनी हनुमंत सत्यवान कोळेकर वय ४० वर्षे रा. कार्ला यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी वजनाचे मापाने मारहाण करून जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी हनुमंत कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.