तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात यंदा भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होत आहेत. मात्र, या गर्दीचा फायदा घेत चोरटेही सक्रिय झाले असून, भाविकांना लक्ष्य करत आहेत. अशाच एका घटनेत बार्शी येथील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गठण चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
सुनिता वसंत वामन (वय ४५, रा. परंडा रोड, शेळके प्लॉट, बार्शी) या ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या शहाजी महाद्वाराजवळील रांगेत उभ्या असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाचे सोन्याचे गठण (किंमत अंदाजे ९०,००० रुपये) चोरून नेले.
या घटनेची जाणीव झाल्यानंतर सुनिता वामन यांनी तात्काळ तुळजापूर पोलिसांना माहिती दिली. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न करता फक्त अर्ज ठेवून घेतला होता. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर सुनीता वामन यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.न्या.सं.303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, नवरात्र उत्सवाच्या काळात भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन तुळजापूर पोलिसांनी केले आहे. गर्दीच्या ठिकाणी विशेष दक्षता घेण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.
दोन संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी होत असतानाच, चोरट्यांनीही आपला धंदा सुरू केला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिला चोरट्यांना रंगेहाथ पकडले आहे. ६ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी मंदिरासमोरील शहाजी महाद्वार येथे दोन महिलांचे पैसे चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जिजाऊ महाद्वार येथे संशयास्पदरित्या वावरत असलेल्या दोन महिला दिसून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. चांदणी राजू लोंढे (वय ४२) आणि सुशीला संजय लोंढे (वय ४०, रा. टकनेश्वर गल्ली, जामखेड, जि. अहमदनगर) अशी या अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचा पैसा जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्यांना तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.