तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा नवरात्र महोत्सव येत्या ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने मातेची मंचकी निद्रा मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी सुरू झाली आहे. नऊ दिवसांची ही मंचकी निद्रा पूर्ण करून माता ३ ऑक्टोबर रोजी पहाटे सिंहासनावर विराजमान होतील.
परंपरेनुसार, मातेच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाकडे आहे. यावर्षी शमशोद्दीन पिंजारी यांच्या पत्नीने हा मान पार पाडला. तत्पूर्वी, सेवेकरी पलंगे कुटुंबियांनी मातेच्या शेजगृहातील चांदीचा पलंग स्वच्छ करून नवीन गाद्या व अंथरुण अंथरले. सोमवारी सकाळी मानकरी जनार्धन निकते यांच्या कुटुंबीयांनी गाद्यांचा कापूस पिंजला होता.
सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर, ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात मातेची मूर्ती सिंहासनावरून हलवून चांदीच्या पलंगावर विसावण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, पुजारी, सेवेकरी व मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.