तुळजापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ‘माने कलेक्शन’ कापड दुकानातून तब्बल 20 साड्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दुकान मालक नागेश दत्तात्रय माने (वय 36 वर्षे, रा. राजश्री शाहू नगर, नळदुर्ग रोड, तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनोळखी तीन महिला आणि एक पुरुषाने मिळून एकूण 23,850 रुपयांच्या साड्या लंपास केल्या आहेत.
दि. 26 मार्च 2025 रोजी नागेश माने यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या त्यांच्या ‘माने कलेक्शन’ दुकानात तीन महिला आणि एक पुरुष आले. दुकानात साड्यांची खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांनी काही वेळ घालवला. त्यानंतर संधी साधून त्यांनी 20 साड्या चोरून नेल्या.
फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि तुळजापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
तुळजापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. दुकानदारांनी सावधगिरी बाळगावी आणि अशा घटनांबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.