अणदूर -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी सोलापुरात सदिच्छा भेट घेतली, त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे राजकीय वारसदार सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी धाराशिवमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी मधुकरराव चव्हाण यांनी तामलवाडीच्या ओमराजेंच्या प्रचार सभेत सहभागी होऊन आपण काँग्रेसमध्येच स्थिर असल्याचे सांगून सर्वांना आचंबित केले . मालक भाजपमध्ये आणि साहेब काँग्रेसमध्ये असल्याने अणदूरमधील काँग्रेसचे सदस्य मात्र कन्फ्यूज झाले आहेत.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना बाबूंराव आणि सुनील असे दोन मुले आहेत. बाबुराव चव्हाण हे जिल्हा परिषदचे सदस्य होते तर सुनील चव्हाण श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे संचालक आहेत. सुनील चव्हाण हेच मधुकररावांचे खरे राजकीय वारसदार आहेत. मात्र सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांच्या प्रचार सभेत सहभागी होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. सुनील चव्हाण यांचा हा निर्णय वैयक्तिक आहे की वडिलांना विचारून आहे, हे त्यांनाच माहित पण मधुकरराव चव्हाण यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी ओमराजेंच्या प्रचार सभेत सहभागी होऊन आपण काँग्रेसमध्ये असल्याचे सांगून आपली बदनामी सुरु असल्याचा कांगावा केला आहे.
मुलगा भाजपमध्ये गेला तरी नातू ( अभिजीत ) काँग्रेसमध्येच आहे मी देखील काँग्रेसमध्येच असून, ओमराजेच्या मागे भक्कमपणे उभा आहे. खडसेंच्या घरात बघा, सून भाजपमध्ये तर मुलगी राष्ट्रवादीमध्ये आहे. कुटुंब मोठे झाले की , कोण कुठे जाईल सांगता येत नाही… माझे वय आता ९१ असून, मला कोणती निवडणूक लढवायची नाही, माझी बदनामी करू नका , अन्यथा कोणाला सोडणार नाही, असे मधुकरावांनी जाहीर सभेत सांगितले.
सुनील चव्हाण भाजपमध्ये तर बाबुराव चव्हाण यांचे पुत्र अभिजीत चव्हाण ( सुनील चव्हाण यांचे पुतणे आणि मधुकरावांचे नातू ) काँग्रेसमध्ये असे चव्हाण कुटुंब दोन पक्षात विखुरले आहे. तर दुसरीकडे साहेब की मालक म्हणत अणदूरमधील काँग्रेसचे सदस्य मात्र कन्फ्यूज झाले आहेत.अणदूर ग्रामपंचायतमध्ये एकूण १७ सदस्य असून, पैकी १६ महाविकास आघाडीचे आहेत. पैकी १३ काँग्रेसचे आणि ३ शिवसेना ( ठाकरे गट ) चे आहेत. १३ पैकी १० सदस्य सुनील चव्हाण यांना मानणारे आहेत, त्यामुळे सरपंच रामदादा आलुरे यांच्यावर अविश्वास येणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, श्री तुळजाभवानी साखर कारखाना आणि श्री तुळजाभवानी सूत गिरणीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी टाळण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे ऐन लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात भेट घेतली. त्यानंतर दोनच दिवसात मधुकरराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने संशयाची सुई निर्माण झाली आहे. केवळ चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी सुनील चव्हाण भाजपमध्ये गेल्याची चर्चा अणदूरमध्ये सुरु आहे.