तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथे दोन राजकीय पक्षांमधील लढत नसून, चक्क दोन मावस भावांमध्येच राजकीय सामना रंगणार आहे. भाजपकडून माजी जिल्हा परिषद सभापती ऍड. दीपक आलुरे आणि शिवसेना (ठाकरे गट) कडून डॉ. जितेंद्र कानडे हे एकमेकांसमोर उभे ठाकले असून, या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नात्यातली लढत आणि राजकीय समीकरणे
अणदूर गटात यंदा भाजपने ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची महाविकास आघाडी झाली आहे. भाजपचे उमेदवार ऍड. दीपक आलुरे हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात आणि त्यांना जिल्हा परिषदेचा गाढा अनुभव आहे. तर, त्यांचे मावस भाऊ आणि प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे हे माजी ग्रामपंचायत सदस्य असून, ‘श्री श्री रविशंकर’ शाळा चालवत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
अणदूरमध्ये लिंगायत समाजाचा प्रभाव
राजकीय दृष्टिकोनातून पाहता अणदूर गटावर लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे. तसेच या भागात काँग्रेसची ताकद मोठी आहे.ऍड. दीपक आलुरे आणि डॉ. जितेंद्र कानडे हे दोघेही लिंगायत समाजाचे आहेत. अणदूरचे सरपंच रामदादा आलुरे यांनी डॉ. कानडे यांना भक्कम पाठिंबा दर्शविला असल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात आहे.
भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
एकीकडे काँग्रेसची साथ मिळाल्याने ठाकरे गटाचा उत्साह वाढला असताना, दुसरीकडे भाजपला अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने वंजारी समाज भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच धनगर समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याने धनगर समाज भाजपवर चिडून आहे. दीपक घोडके यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने संताप व्यक्त होत आहे.
पंचायत समितीसाठीही चुरस
जिल्हा परिषदेसोबतच अणदूर पंचायत समितीच्या जागांसाठीही जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
-
महाविकास आघाडी: काँग्रेसकडून विशाल शेटे रिंगणात आहेत.
-
भाजप: सुनील चव्हाण यांचे पुत्र रणवीर चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
एकंदरीत, अणदूर गटात नात्यातील गुंतागुंत, जातीय समीकरणे आणि राजकीय डावपेच यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार, हे निश्चित.






