तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटल्याने, काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना अखेर उमेदवारी मिळाली आहे, पण त्यामुळे राष्ट्रवादीचे भाऊ, अर्थात अशोक जगदाळे, कमालीचे नाराज झाले आहेत. तीन महिने त्यांनी जोरदार फटाकेबाजीची तयारी ठेवली होती. फटाके तर फुटले, पण उमेदवारी मात्र फुस्स गेली!
भाऊंच्या राजकीय प्रवासात “आहे पैसा, पण नाही उमेदवारी” असं धोरण सतत समोर येत आहे. मुंबई-सोलापूरमध्ये बिल्डर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाऊंच्या ‘पैसा सर्वस्व’ या फिलॉसॉफीला तुळजापूरच्या काँग्रेसवाल्यांनी चांगलीच ठेच लावली आहे. लोकांच्या मनात राजकीय बदल घडवण्याचे स्वप्न बाळगलेल्या भाऊंनी आधी वंचित बहुजन आघाडी, नंतर राष्ट्रवादी, आणि आता काँग्रेसपर्यंत फिल्डिंग लावली होती. शेवटी दिल्लीतून थेट उमेदवारी आणण्याचा प्रयत्न केला, पण धीरज पाटील यांनी त्यांच्या मेहनतीने भाऊंना झटका दिला.
गेल्या तीन महिन्यात भाऊंनी जनतेसाठी शेतकरी मेळावे, बियाणे वाटप, होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम, तरुणांसाठी रोजगार मेळावे अशा प्रकारे सढळ हस्ते खर्च केला. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे हे सगळं काही फुकट गेलं. फेसबुकवर ‘भाऊ लढणार, बदल घडणार’ ही हवा त्यांचं चमचं मंडळ निर्माण करत होतं, पण आता ती हवा गुल झाली आहे.
भाऊंना आता ‘फुटिरतावादी’ बनायचं का? अशी चर्चाही सुरू आहे. त्यासाठी तिसरी आघाडी किंवा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आश्रय घ्यावा लागणार आहे, पण त्यासाठी त्यांच्याकडे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत.
तर, तुळजापूरच्या फुस्स फटाक्यांनी दाखवून दिलं, राजकारणात फक्त पैसा असून चालत नाही, निष्ठा हीसुद्धा पवित्र असावी लागते!