तुळजापूर : मुलाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका ५० वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या भावाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर शहरात घडली आहे. हत्यारे आणि दगडांनी केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी शहाजी हावळे (वय ५०, रा. बोरी, ता. तुळजापूर) यांनी उपचारादरम्यान रुग्णालयात दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नागेश नारायण जानराव, पृथ्वीराज हंसराज जानराव, देवानंद विठ्ठल जानराव, धैर्यशील सिद्धार्थ जानराव, इंद्रजित सिद्धार्थ जानराव, अजय किसन जानराव, आनंद चिगुबा जानराव, प्रणव हंसराज जानराव, नागेश सुधाकर जानराव, सोमधुत उमाची जानराव, इंद्रजीत विशाल पांडागळे, आणि प्रतिक बालाजी राऊत (सर्व रा. बोरी, ता. तुळजापूर) अशी या १२ आरोपींची नावे आहेत.
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी हावळे यांचा मुलगा संग्राम याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच रागातून शुक्रवार, दि. २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपींनी राष्ट्रीय महामार्ग ५२ (NH-52) लगत असलेल्या उड्डाणपुलाजवळील टायर दुकानासमोर बेकायदेशीररित्या जमाव जमवला.
तेथे शिवाजी हावळे आणि त्यांचे भाऊ भिवाजी हे असताना आरोपींनी त्यांना गाठले. सुरुवातीला शिवीगाळ करत त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोबत आणलेली कत्ती, लोखंडी रॉड, टॉमी, काठी आणि दगडांनी दोन्ही भावांवर अमानुष हल्ला चढवला. या हल्ल्यात शिवाजी आणि भिवाजी हावळे हे गंभीर जखमी झाले आहेत. जाताना आरोपींनी ‘तुमच्या मुलाला जीवे ठार मारू’, अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर जखमी हावळे बंधूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी (दि. २३ मार्च) शिवाजी हावळे यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून तुळजापूर पोलिसांनी सर्व १२ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, आणि ३५१(३) अन्वये दंगल आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






