नळदुर्ग : गावात चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून जमावाने दोघांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडली आहे. या अमानुष मारहाणीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात १६ जणांविरोधात खुनासह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन चंदर काळे (रा. पारधी वस्ती, तुळजापूर खुर्द, जि. धाराशिव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सागर जयराम भोसले हे या मारहाणीत जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निलेगाव येथील मारुती मंदिरासमोर हा प्रकार घडला.
आरोपी पिंकी शैलेश शिंदे, विकी शिंदे आणि राहुल शिंदे यांनी बबन काळे आणि सागर भोसले या दोघांना पकडून ठेवले. ‘हे दोघे गावात चोरी करण्यासाठी आले आहेत’, असे सांगून त्यांनी गावातील लोकांना बोलावून घेतले. यानंतर जमावाने एकत्र येत बबन काळे आणि सागर भोसले यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बबन काळे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत बबन यांचे चिरंजीव राहुल बबन काळे (वय २१, रा. पारधी वस्ती, तुळजापूर खुर्द) यांनी शनिवारी (ता. ११ एप्रिल) नळदुर्ग पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
राहुल काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी मोहसीन वजोद्दीन इनामदार, पापा वजोद्दीन इनामदार, शंकर ऊर्फ श्रीधर जमादार, विठ्ठल महादेव घंटे, प्रकाश दशरथ जमादार, धनेश्वर प्रकाश जमादार, आदित्य प्रकाश जमादार, सचिन मारुती जमादार, पवन हनमंत जमादार, दादा बस्वराज जमादार, नितीन मारुती जमादार, समर्थ रमेश जमादार, रमेश अर्जुन जमादार, पिंकी शैलेश शिंदे, विकी शैलेश शिंदे आणि राहुल शैलेश शिंदे (सर्व रा. निलेगाव , ता. तुळजापूर) या १६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(२), ११८(१), ११५(२), १८९, १९०, १९१ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायदा कलम ३(२)(v) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलिस करत आहेत.







