तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून भाविकांनीच आता कमान सांभाळली आहे! मंदिर परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन महिलांवर भाविकांची करडी नजर गेली आणि पाहता पाहता एकाला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दि. १३ फेब्रुवारी रोजी, श्री तुळजाभवानी मंदिराच्या शहाजीराजे महाद्वाराजवळ या महिलांनी भाविकांच्या पर्स आणि मोबाईलवर हात साफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाविकांनी सतर्कता दाखवत त्यांना थेट पोलिस ठाण्यात पोहोचवले. मंदिर परिसरात भाविकांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
चोरीच्या घटनांवर ब्रेक?
मंदिर परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने भाविक अस्वस्थ आहेत. विशेषतः, मागील आठवड्यात मुंबईहून आलेल्या एका महिलेचे गंठण आणि अन्य मौल्यवान साहित्य चोरीला गेले होते. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांची सखोल चौकशी करून यामागे मोठी टोळी कार्यरत आहे का, याचा शोध घ्यावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
➡ भाविकांच्या सतर्कतेमुळे मंदिर परिसर सुरक्षित राहील का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे, पण चोरट्यांना धडा शिकवण्याची भाविकांची तयारी मात्र जोरात सुरू आहे!