तुळजापूरच्या कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीत आज अचानक आगीचे लोळ उठले. गेली अनेक वर्षे बंद पडलेली ही सूतगिरणी अचानक शॉर्टसर्किटमुळे धगधगू लागली, आणि क्षणातच लाखो रुपयांचे नुकसान झाले. पण हा अपघात होता की नियोजनबद्ध कट, हा खरा प्रश्न आहे!
आग लागल्याचे समजताच तुळजापूर पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीने प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, ही आग खरीच शॉर्टसर्किटमुळे लागली का कोणीतरी मुद्दामहून पेटवली, यावर चर्चा रंगली आहे.
आगीआड भ्रष्टाचाराचा धूर?
कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणी गेल्या काही वर्षांपासून बंद होती. मात्र, आतल्या मशिनरी हळूहळू गायब होत होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही यंत्रसामग्री चोरीला गेली होती, आणि आता उरलेसुरले पुरावेही आगीत खाक झाले.
कोण आहेत या आगीमागचे हात?
ही आग अनपेक्षित होती की कोणी घोटाळ्याच्या फाईलींची राख करणारा डाव खेळला, याचा तपास गरजेचा आहे. शॉर्टसर्किटचा दावा किती विश्वासार्ह आहे? की हा भ्रष्टाचार लपवण्याचा सोपा मार्ग होता? या प्रश्नांची उत्तरे सापडली, तरच या धुरामागचं सत्य बाहेर येईल!