१४ फेब्रुवारीपासून सुरू झालेलं तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण आता केवळ तपासाचं नव्हे, तर राजकीय आरोप-प्रत्यारोप, माध्यमांची पोकळ पत्रकारिता आणि पोलिसांच्या कागदी शौर्याचं नाटक बनलं आहे.
३० दिवसांत २१ फरार, आणि पोलिसांचं ‘नोटीस ड्रामा’
पोलिसांनी ३५ आरोपींपैकी १४ जणांना जेलमध्ये पाठवून उरलेल्यांवर कागद झटकले. एकही फरार आरोपी गेल्या महिन्यात अटक झालेला नाही. मग तपास चालतोय कुठे?
८० निरपराधांना नोटीस देऊन पोलीस चौकशीला बोलवतायत, पण २१ फरारांची बिनधास्त फिरकी सुरू आहे. त्यातल्या काहींनी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेत. हेच ते गुन्हेगार की जे “लॉयर” वापरून कायद्याला झुलवतायत?
माध्यमं बिनदिक्कत, कुणाचंच नाव घेतलं की ब्रेकिंग!
ड्रग्ज प्रकरणातील १३ पुजारी… हे बातमीत वाचून धर्मगुरू भडकले, पण माध्यमांना याचा पत्ता आहे का? की फक्त “टीआरपीच्या राक्षसासाठी” काहीही छापायचं, आणि पुन्हा “सॉरी , चुकून झालय” असं म्हणून मोकळं व्हायचं?
त्या पत्रकारावरही आरोप झालेत – ड्रग्ज प्रकरणात खोट्या बातम्या पेरल्याचा! मग हे पत्रकार आहेत की कोणाचे प्रॉक्सी? माहितीच्या नावावर अफवा पेरणं म्हणजे पत्रकारिता की बाजारात ‘पी.आर.’ करणे?
राजकीय मातीच्या ढिगात वाकडं उगमणारं नाटक
एकीकडे खा. ओमराजे निंबाळकर भाजप आमदार राणा पाटलांवर बोट ठेवतात, दुसरीकडे मैदानात ते नसून विजय गंगणे नावाचा त्यांचा कट्टर समर्थक उतरतो – तो ही एका खासदाराच्या वडिलांची थेट हेटाळणी करत. पवनराजे दूध विकत होते, हे जाहीरपणे सांगून गंगणे काय साधत आहेत?
या भाषेचा दर्जा, राजकारणात झिरपलेल्या गलिच्छवृत्तीचं प्रदर्शन करतं.
काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील नैतिकता आठवतात म्हणून राजीनाम्याची मागणी करतात, पण कोणी जबाबदारी घेत नाही.
नेमकं चुकतंय कुठं?
- पोलिसांना फरार आरोपी सापडत नाहीत, पण सामान्यांना नोटीस द्यायला वेळ आहे.
- माध्यमं टीआरपीसाठी धर्म, मंदिर, पुजारी यांना चिखलात ओढतायत.
- राजकीय नेते स्वतःच्या अस्तित्वासाठी एकमेकांचे वडील, दूध आणि कार्यकर्ते उकरून काढतायत.
हा विषय फक्त ड्रग्जचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या अपयशाचा आहे.
- पोलीस-राजकीय साखळी गळालेली आहे.
- पत्रकारिता दिशाहीन झाली आहे.
- लोकशाहीतली नैतिकता कुजली आहे.
प्रश्न इतकाच — तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात खरं गुन्हेगार कोण? तो २१ जणांपैकी कोणीतरी? की सगळ्यांचा हा एकत्रित खेळ, जिथं बळी जातो तो केवळ सामान्यांचा?
– बोरूबहाद्दर