धाराशिव: तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक शिंदे यांना धाराशिव जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे प्रकरणातील एकूण ३७ आरोपींपैकी अटकपूर्व जामीन मिळवणारे प्रा. शिंदे हे पहिलेच आरोपी ठरले आहेत.
या प्रकरणात तामलवाडी पोलिसांनी सुरुवातीला प्रा. आलोक शिंदे यांचे भाऊ संकेत शिंदे यांना अटक केली होती. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणात प्रा. आलोक काकासाहेब शिंदे यांचेही नाव गोवल्याचा दावा त्यांचे वकील विशाल साखरे यांनी न्यायालयात केला. “प्रा. शिंदे यांचा या ड्रग्ज प्रकरणाशी कोणताही संबंध नाही आणि केवळ त्यांच्या भावाला अटक झाली म्हणून त्यांचे नाव यात गोवण्यात आले आहे,” असा युक्तिवाद ॲड. साखरे यांनी न्यायालयासमोर केला.
ॲड. साखरे यांनी प्रा. शिंदे यांच्यातर्फे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करत, त्यांचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याने त्यांना जामीन मंजूर करण्याची विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश श्रीमती मिटकरी यांनी प्रा. आलोक शिंदे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे अत्यंत गुंतागुंतीचे असून यामध्ये आतापर्यंत ३७ जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी २० आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर १७ आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींमध्ये प्रा. शिंदे यांचा समावेश होता, मात्र आता न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामुळे तुळजापूर आणि परिसरातील शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. एका प्राध्यापकाचे नाव या प्रकरणात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला कोणती नवी दिशा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.