धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे केवळ गुन्हेगारी कृत्य नाही, तर समाजाच्या जखमेवरच्या मीठासारखे आहे. जिल्ह्याच्या अस्मितेला काळिमा फासणारे हे प्रकरण दिवसेदिवस अधिक गंभीर होत चालले आहे. धाराशिव लाइव्हच्या धडाकेबाज बातमीने या प्रकरणाला वाचा फोडली आणि पोलिसांनी काही नावे उघड केली. परंतु, खरे गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत, आणि राजकीय दबावामुळे कारवाईला खीळ बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
ड्रग्ज रॅकेटमध्ये समोर आलेली नावे पाहता, अंगावर काटा येतो. माजी नगराध्यक्ष, माजी सभापती, राजकीय कार्यकर्ते यांची नावे ड्रग्ज पेडलर म्हणून जाहीर झाल्याने समाजमनाला हादरा बसला आहे. एकेकाळी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते आज ड्रग्ज रॅकेटचे सूत्रधार कसे काय बनले? जनतेला दिशा दाखविण्याऐवजी तरुणांना ड्रग्जच्या खाईत लोटणारे हे राजकीय बडे नेते कोणत्या मुखाने समाजासमोर येणार?
या प्रकरणातील काही आरोपींवर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी जगतातील हे मोहरे जिल्ह्यात दहशत पसरवून सत्तेच्या आश्रयाने मोकाट फिरत होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) लावण्यासाठी अजून काय पुरावे लागतात? एका प्रकरणात मोक्का लागू करायचा आणि दुसऱ्या प्रकरणात नको, हे दुहेरी धोरण का? जर कायदा सर्वांसाठी सारखाच असेल, तर या गुन्हेगारांना मोक्काच्या कचाट्यात का घेतले जात नाही?
या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे, हे स्पष्ट दिसत असतानाही तपास तामलवाडी पोलिसांकडेच ठेवला जातो. एसआयटीसारख्या स्वतंत्र पथकाकडे तपास देण्यास प्रशासन का टाळाटाळ करते आहे? तपासाच्या नावाखाली केवळ खानापूर्तीसाठी चाचपडले जात आहे का? फरार आरोपी मोकाट फिरत आहेत आणि तपासयंत्रणा झोपेत आहे. काही कार्यकर्ते आणि नेत्यांचे नाते उघड होत असतानाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा का उगारला जात नाही? पोलिसांना कारवाईसाठी कोण अडवतोय?
या प्रकरणात भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांची नावे आल्यानंतर पक्षीय पातळीवरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. एकमेकांवर बोट ठेवत राजकारण करणारे हे नेते ड्रग्जची मुळे उखडण्यासाठी किती गंभीर आहेत? आपल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यास का कचरतात? समाजाच्या विध्वंसाला खतपाणी घालणाऱ्यांना पाठबळ का दिले जाते? राजकीय स्वार्थ आणि ड्रग्ज रॅकेटमधील संबंधांचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे.
तुळजापूरसारख्या धार्मिक स्थळाच्या पवित्रतेला गालबोट लावणारे हे प्रकरण म्हणजे फक्त गुन्हेगारी नाही तर समाजविघातक कृत्य आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही याची गंभीर दखल घेऊन राजकीय स्वार्थ बाजूला ठेवावा. स्थानिक प्रशासनाने ठोस पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी. न्यायालयाने या प्रकरणाचा स्वतःहून तपास हाती घेऊन दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टात शिक्षा करावी.
धाराशिव जिल्हा आणि तुळजापूर नगरीला या ड्रग्ज रॅकेटने काळे पांघरले आहे. याचे पायाभूत कारण म्हणजे राजकीय दबाव, पोलीस यंत्रणेची ढिसाळ भूमिका आणि गुन्हेगारीचे राजकीय आश्रय. समाजात या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी समाजानेच पुढाकार घ्यावा आणि दोषी राजकीय कार्यकर्त्यांचा निषेध करून त्यांना समाजातून हद्दपार करावे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे केवळ एक गुन्हा नाही तर समाजाचे पतन करणारे संकट आहे. समाजाच्या स्वच्छतेसाठी आणि धाराशिवच्या अस्मितेसाठी हे रॅकेट नष्ट होणे गरजेचे आहे. पण प्रश्न असा आहे – कोण उखडणार या ड्रग्ज रॅकेटची मुळे?
- बोरूबहाद्दर