तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा नवा अध्याय चालू आहे, आणि रंगमंचावर असलेली पात्रे मनोरंजनाची पूर्ण हमी देत आहेत. भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार ऍड. धीरज पाटील यांच्यातील हा सामना, परंतु या रंगमंचावर एक गाजलेलं पात्र म्हणजे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण!
चव्हाण साहेबांचा राजकीय इतिहास पाहिला, तर त्यांनी आठ वेळा निवडणूक लढवली आहे, त्यापैकी पाच वेळा जिंकले आहेत, म्हणजे तुळजापूरच्या राजकारणात त्यांचा ठसा आहे. पण वय ९० झाल्यावरही ते निवृत्तीला तयार नाहीत; त्यांना अजूनही वाटतं, “अभि तो मैं जवान हूँ!” २०१९ मध्ये भाजपचे राणा पाटील यांनी त्यांना निवृत्त केलं, पण यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसने त्यांना सल्ला दिला – “साहेब, आता जरा आराम करा!”
काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिली, पण चव्हाण साहेब हे मानी माणूस! त्यांनी काँग्रेसचा आदेश मानला नाही. त्यांनी तडक आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, आणि माध्यमांना सांगितलं, “माझ्या पाठीशी काँग्रेस नाही, जनताच आहे. काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला आहे, आणि हा अन्याय मी सहन करणार नाही!” हे बोलून चव्हाण साहेबांनी एक खळबळ उडवून दिली.
मात्र हे नाट्य अगदीच अल्पजीवी ठरलं. ४ नोव्हेंबरला, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, चव्हाण साहेबांनी अचानक आपला अर्ज मागे घेतला. असं म्हणायला लागले की, “शारीरिक त्रास होतोय, मी आजारी आहे, पुण्यात उपचार करतोय.” तुळजापूरचे मतदार यावर विचारात पडले – आजार होता तर उमेदवारी अर्ज कश्याला भरला होता ? का निवडणूक प्रचाराची भट्टी तापली की पुण्यात आराम करायचं?
चव्हाण साहेबांचा राजकीय वारसदार सुनील चव्हाण यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसला धक्का बसला होता, आणि आता धीरज पाटील यांच्या प्रचाराला बूस्ट देणं तर दूरच, दुसरे पुत्र बाबुराव चव्हाण आणि नातू अभिजित चव्हाण हे देखील प्रचारात सक्रिय नाहीत. सगळं चव्हाण कुटुंब हळूहळू धीरज पाटील यांच्यापासून दुरावत चाललंय.
धीरज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले हे उमेदवार, आता एकटा लढा देत आहेत. त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार म्हणजे “एकला चालो रे”चा नारा झाला आहे. गावोगावी, चौकाचौकात, प्रचाराच्या पायवाटेवर धीरज पाटील आपल्या भाषणांनी मतदारांना प्रेरित करायला निघालेत, पण पाठीराख्यांची संख्या कमीच आहे. एकीकडे भाजपचे राणा पाटील हजारो समर्थकांसह ठाम आहेत, तर दुसरीकडे धीरज पाटील यांचं ‘एकाकी योद्धा’ होण्याची वेळ आली आहे.
चव्हाण साहेबांनी निवडणुकीत थेट प्रवेश केला असता, तर काँग्रेससाठी थोडा आधार मिळाला असता, पण त्यांचा पुण्यात निवांत ‘आराम’ हा धीरज पाटील यांना सणसणीत झटका देणारा ठरतोय. चव्हाण कुटुंबाशिवाय तुळजापूरमध्ये काँग्रेसचं राजकारण चालू शकत नाही, असा संदेश ते परतून देतायत की काय, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
तुळजापूरच्या मतदारसंघातली ही निवडणूक म्हणजे जणू काही एक राजकीय चित्रपट झाला आहे. मुख्य पात्रं आहेत, साहजिकच नायक म्हणून राणा पाटील, विरोधक म्हणून धीरज पाटील; पण खरी कमाल तर चव्हाण साहेबांच्या कॅरेक्टरची आहे. अगदी शांत पुणेरी विश्रांतीमध्ये असलेल्या चव्हाण साहेबांनी आपल्या निर्णयांमुळे निवडणुकीचा प्लॉट अधिकच मनोरंजक बनवला आहे. आता खरा प्रश्न असा आहे की, तुळजापूरच्या मतदारांनी या नाट्यमय निवडणुकीत आपली भूमिका कशी निभवायची? चव्हाणांच्या पुणेरी शांततेला पाठिंबा द्यायचा, की धीरज पाटील यांच्या ‘एकला चालो रे’ धाडसाचं कौतुक करायचं?
– बोरूबहाद्दर