तुळजापूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारार्थ तुळजापुरात सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला. काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांना त्यांनी “मॅनेज उमेदवार” म्हणून संबोधले आणि काँग्रेसला लोकांची दिशाभूल करण्याचा गंभीर आरोप केला.
सुजात आंबेडकर म्हणाले, “काँग्रेसच्या धीरज पाटील यांना बळीचा बकरा बनवून मैदानात उतरवले आहे, कारण त्यांना ठाऊक आहे की, खरी लढाई ही भाजपच्या राणा जगजीतसिंह पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या ताई डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्यात आहे. लोकांनी आता या गद्दार आणि बनवाबनवी करणाऱ्या नेत्यांच्या फसव्या वागणुकीला जाब विचारायला हवा.”
सभेत सुजात आंबेडकरांनी भाजप उमेदवार राणा पाटलांवरही कठोर शब्दांत टीका केली. “आत्तापर्यंत वाड्यातून बाहेर न पडणारा पाटील आता गावगाड्यात, तांड्या-वस्त्यांमध्ये, मुस्लिम मोहल्ल्यात फिरतो आहे. त्यांना ताईंच्या लोकप्रियतेची खरी भीती आहे. त्यांनी आजवर सर्वसामान्यांच्या वेदना जाणून घेतल्या नाहीत, पण आता ही निवडणूक जवळ आली की त्यांना जनतेची आठवण येते,” असा आरोप करत सुजात आंबेडकरांनी भाजपला कडक शब्दांत धारेवर धरले.
या वेळी प्रशासनालाही सुजात आंबेडकर यांनी इशारा दिला. “सध्याचे आमदार आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून प्रशासनावर दबाव आणत आहेत. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, प्रशासनाने हे लक्षात ठेवावे की, ताई आमदार झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची सत्ता असेल, आणि अशावेळी अन्या आणि अन्याय करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. आमचा संघर्ष ही अन्यायाच्या विरुद्धची लढाई आहे.”
डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी देखील भाषणात मतदारसंघातील विकासाच्या वादावर राणा पाटलांना धारेवर धरले. “गेल्या अनेक वर्षांत मतदारसंघात एक टक्काही विकास झालेला नाही. आरोग्य आणि शिक्षणाच्या नावाने शून्य कामगिरी केलेल्या राणा पाटलांनी जर आई तुळजाभवानीकडे थोडी अक्कल मागितली असती, तर त्यांना जनतेच्या गरजा कळल्या असत्या,” असे म्हणत त्यांनी पाटलांची चांगलीच खिल्ली उडवली. “मी मतदारसंघाच्या प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास करणार आहे. या भ्रष्ट नेत्यांना हद्दपार करणे हीच माझी प्राथमिकता असेल,” असे ठाम प्रतिपादनही त्यांनी केले.
यावेळी मंचावर नवनाथ वाघमारे, डॉ. नितीन ढेपे यांसह विविध नेते उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. स्नेहा सोनकाटे यांना प्रचंड प्रतिसाद दिला, आणि सभा उत्स्फूर्त घोषणा व घोषणाबाजीत रंगली. वंचित बहुजन आघाडीच्या या सभेने तुळजापूरच्या निवडणूक वातावरणात एक नवा जोश निर्माण केला असून, प्रस्थापित नेत्यांना खुला आव्हान देण्याचे काम सुजात आंबेडकर यांनी केले आहे.