धाराशिव : जिल्ह्यात चोरी आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, येरमाळा, परंडा आणि वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. यात येरमाळा येथे पवनचक्की प्रकल्पाची तोडफोड करून तब्बल १७ कोटी ६० लाखांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, परंड्यात भरदिवसा सराफा दुकानातून सोन्याचे दागिने आणि वाशीत हॉटेलसमोरून बुलेट चोरीला गेली आहे.
१. पवनचक्कीची तोडफोड आणि तांब्याच्या केबलची चोरी; १७ कोटींहून अधिक नुकसान
येरमाळा : बावी (ता. धाराशिव) आणि इतर ठिकाणी असलेल्या ‘सेरेंटीका’ कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात अज्ञातांनी मोठी तोडफोड केली आहे. दि. ३१ जानेवारी २०२५ ते ७ मे २०२६ या कालावधीत लोकेशन डीवाय-२ ते ओएस-१३ या ठिकाणी वेगवेगळ्या पवनचक्कीचे पॉईंट, ट्रान्सफॉर्मर आणि ३३ केव्ही लाईनची अज्ञातांनी तोडफोड केली.
यातून तब्बल २ लाख ९ हजार रुपये किमतीची ३०५५ मीटर लांबीची कॉपर केबल (२४० स्क्वेअर एमएम साईज) चोरीला गेली आहे. तसेच, पवनचक्कीचे जनरेटर व ट्रान्सफॉर्मरची तोडफोड केल्यामुळे कंपनीचे एकूण १७ कोटी ६० लाख २२ हजार ५७० रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. याप्रकरणी सेरेंटीका कंपनीचे असिस्टंट मॅनेजर प्रवीण बाळासाहेब फडके (वय ४३, ह.मु. केज रोड, कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार (दि. १८) येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) आणि ३२४(५) अन्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. परंड्यात ग्राहक बनून आलेल्या दाम्पत्याकडून दागिन्यांची चोरी
परंडा : शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर असलेल्या ‘वर्धमान ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानातून भरदिवसा दागिने चोरीला गेले. रविवार (दि. १७) सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास दुकानात ग्राहकांची वर्दळ असताना एक अज्ञात पुरुष आणि महिला ग्राहक बनून आले. त्यांनी नजरचुकीने दुकानातून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा आणि २ ग्रॅम ५०० मिली वजनाचा सोन्याचा टॉप्स (कानातील दागिना) चोरून नेला.
याप्रकरणी दुकानदार मयूर मनोजकुमार बेदमुत्ता (वय ३५, रा. मंडई पेठ, परंडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवार (दि. १८) परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिला व पुरुषाविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. वाशीत हॉटेलसमोरून ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ पळवली
वाशी : सरमकुंडी फाटा येथील हॉटेल यशोदासामोर उभी केलेली अंदाजे ७० हजार रुपये किमतीची ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ (क्र. MH 25 AG 8761) अज्ञाताने चोरून नेली. ही घटना दि. १६ मे सायंकाळी ५ ते १७ मे सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी बुलेट मालक श्रीकांत विक्रम जगदाळे (वय ४१, रा. वाशी, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात सोमवार (दि. १८) अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





