तुळजापूर : तालुक्यातील नांदुरी येथे शेत रस्त्याच्या जुन्या वादातून दोन तरुणांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप, काठी आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.
याप्रकरणी नारायण महादेव सरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण सरडे (रा. नांदुरी) यांचे पुत्र श्रीधर नारायण मुळे आणि लखन नारायण मुळे यांना आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरून अडवले. आरोपी मोहन नागनाथ मुळे, अभिषेक मोहन मुळे, मुकुंद जीवन मुळे, सुशील जीवन मुळे, आस्तिक महावीर मुळे आणि नागनाथ रामा मुळे (सर्व रा. नांदुरी) यांनी श्रीधर व लखन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर वाद विकोपाला जाऊन आरोपींनी पीडित तरुणांना काठी आणि लोखंडी गोल पाईपने मारहाण केली, तसेच लाथाबुक्यांनीही मारले. यामध्ये दोघेही जखमी झाले. यावेळी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
नारायण सरडे यांनी २ जून रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम 118(1), 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2), 351(3)) गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.