तुळजापूर शहरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवल्याचा राग मनात धरून एका गावगुंडाने सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्यावर दोन वेळा हल्ले केले. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावगुंडाची धमकी आणि पहिली मारहाण
दिनांक 1 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5:50 वाजता, राजाभाऊ माने आणि त्यांचा पोलिस अंगरक्षक कोळी हे धाराशिव रोडने स्कुटीवरून जात असताना एक गावगुंड आणि त्याच्या मित्राने त्यांचा रस्ता अडवून शिवीगाळ केली. “आता तुला जगू देणार नाही,” अशी धमकी देत त्याने माने यांना धक्काबुक्की केली.
याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी माने तुळजापूर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, गावगुंडाचा माज एवढा वाढला आहे की तो थेट पोलीस ठाण्यात येऊन देखील शिवीगाळ आणि दंगा करू लागला. आश्चर्याची बाब म्हणजे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी या घटनेची कोणतीही दखल घेतली नाही आणि गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.
सीसीटीव्हीत कैद तरीही पोलिसांचा दुर्लक्ष!
घटनेनंतर 6 मार्च 2025 रोजी संध्याकाळी, राजाभाऊ माने आणि त्यांचे अंगरक्षक इंगळे हे आंबेडकर चौकातून घरी जात असताना पुन्हा त्याच गावगुंडाने पुन्हा हल्ला चढवला. भर चौकातच माने यांना मारहाण करत त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिस अंगरक्षक इंगळे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद असूनही पोलीस निरीक्षक मांजरे यांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ सुरू ठेवली आहे.
गावगुंडाला राजकीय वरदहस्त?
तुळजापूर पोलीस ठाण्याचा चार्ज घेताच पोलीस निरीक्षक मांजरे यांनी काही राजकीय नेत्यांशी हातमिळवणी करून त्या गावगुंडास संरक्षण सुरू केल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांच्या मते, 1 मार्चच्या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असती, तर 6 मार्चची घटना घडलीच नसती. परंतु, गावगुंडाच्या राजकीय संबंधांमुळे पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई केली जात नाही.
नागरिकांमध्ये संताप – पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
सामाजिक कार्यकर्त्याला भर रस्त्यात मारहाण करूनही पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, हे धक्कादायक असून, पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध धंद्यांविरोधात बोलणाऱ्यांना दबवण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तुळजापूरमधील वाढत्या गुन्हेगारीला राजकीय वरदहस्त मिळत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजाभाऊ माने यांना न्याय मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
News Update
अखेर पोलिसांची कारवाई – गावगुंड पीके उर्फ प्रशांत कांबळेवर गुन्हा दाखल