तुळजापूर – तुळजापूरमधील आयपीएल सट्टा प्रकरण आता पोलिसांनाच चेंडू झेलायला लावणारं ठरतंय. भोसले गल्ली येथील प्रमोद रमेश कदम या बुकीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता या प्रकरणातील ‘मांडवली’च्या आरोपांनी खळबळ माजवली आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ दिगंबर माने यांनी दि. 7 एप्रिल 2025 रोजी धाराशिवचे पोलीस अधीक्षक तसेच तुळजापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
📌 निवेदनात नेमकं काय?
राजाभाऊ माने यांनी याआधीही 14 नोव्हेंबर 2024 रोजी गोपनीय निवेदन दिलं होतं. त्यावर अद्याप कारवाई अपुरी असल्याचं नमूद करत त्यांनी या नव्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे.
त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की,
👉 30 मार्च रोजी प्रमोद कदम याला पोलिसांनी सट्टा प्रकरणात मुद्देमालासह पकडलं.
👉 मात्र त्याला तुळजापूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ₹5 लाखांची मागणी करण्यात आली.
👉 नंतर ही रक्कम 2 लाखांवर, 1.5 लाखांवर आली आणि शेवटी ₹80,000 घेत त्याच्यावर फक्त साधा मटक्याचा गुन्हा दाखल करून सोडण्यात आलं.
👉 राजाभाऊ माने यांनी प्रमोद कदम याची भेट घेऊन ही माहिती रेकॉर्डिंगसह घेतली असून, ती पुराव्यासाठी उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
🧾 चार मोठ्या मागण्या
राजाभाऊ माने यांच्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
- पोलिसांवर कारवाई – आर्थिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित पोलिसांची चौकशी व्हावी.
- मोबाईल डाटा तपासणी – आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि डाटा तपासून संपूर्ण सट्टा नेटवर्क उघड करावं.
- रजिस्टरमधील नोंदींची चौकशी – जप्त रजिस्टरमध्ये नमूद नावांची चौकशी करून मोठे मासे गळाला लावावेत.
- स्वतंत्र यंत्रणा – या प्रकरणाची चौकशी बाह्य यंत्रणेमार्फत व्हावी, जेणेकरून न्याय्य व पारदर्शक प्रक्रिया होईल.
📺 धाराशिव Live वर आलेली बातमी ठरली टर्निंग पॉइंट!
दिनांक 4 एप्रिल रोजी ‘धाराशिव Live’ वर या प्रकरणाची सविस्तर बातमी आली. त्यानंतर नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “सट्टा थांबत नाही, तर मांडवलीला अभय मिळतंय,” असा रोखठोक सवाल उपस्थित केला जात आहे.
“आता फक्त बुकी नव्हे, तर चौकशीची विकेट पोलिसांच्या हातात आहे. खेळ कोणाचा आणि डील कोणाची – हे उघड व्हायलाच हवं!”