धाराशिव : तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांच्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, याच शाखेत कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे हाच या चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला नागपूर येथून अटक केली असून, त्याच्याकडून ११ लाख रुपयांची रोकड आणि २ किलो १५९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेतून ३४,६०,८६० रुपये रोख आणि २ किलो ७२२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ कोटी १३ लाख १९ हजार ७०३ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोरगरिब नागरिकांनी त्यांच्या गरजेपोटी तारण म्हणून ठेवलेल्या दागिन्यांची ही चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.
पोलिसांपुढे होते मोठे आव्हान
गुन्ह्याचे गांभीर्य आणि चोरीच्या रकमेचे मोठे मूल्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना याच शाखेतील शिपाई दत्ता कांबळे याच्यावर संशय आला. मात्र, दत्ता हा उच्चशिक्षित असल्याने आणि त्याने पूर्वनियोजन करून गुन्हा केल्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते.
अखेर नागपुरातून आवळल्या मुसक्या
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर दत्ता कांबळे हा नागपूरमध्ये लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दत्ताने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेला मुद्देमाल काढून देण्याची तयारी दर्शवली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपये रोख आणि २ किलो १५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.