अणदूर – तुळजापूर तालुक्यातील अणदूर मध्ये सोमवारी मध्यरात्री कारमधून आलेल्या अज्ञात चोरटयांनी पाच ते सहा दुकाने फोडली. एका सराफ व्यापाऱ्याला लाखो रुपयाचा गंडा घातला तर एका किराणा दुकानातील काजू, बदाम पळवले. एकाच रात्री झालेल्या या धाडसी चोऱ्यामुळे व्यापारी आणि नागरिकांत घबराट पसरली आहे.
गेल्या काही दिवसापासून नळदुर्ग, अणदूर, जळकोट, ईटकळ परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नळदुर्ग पोलीस मात्र रात्रीची गस्त घालण्याऐवजी झोपा काढत आहेत, त्याचाच गैरफायदा चोरटे उचलत आहेत.
कारमधून आलेल्या अज्ञात चोरटयांनी अणदूर श्री खंडोबा मंदिरासमोरील एका सराफाचे सोन्या – चांदी विक्रीचे दुकान फोडून त्यातील छोटे कपाट पळवले. या सराफ व्यापाऱ्याकडे तिजोरी नव्हती, छोटे कपाट होते. चोरटयांनी हे कपाटच उचलून नेले आणि खुदावाडी रोडवर या कपाटातील सात ते आठ तोळे सोने, चांदी, रोख रक्कम असा पाच लाखाचा ऐवज लंपास केला. तसेच एका किराणा दुकानातील काजू, बदाम,मेडिकल दुकानातील कॅडबरी, मोबाईल शॉपीतील रोख रक्कम पळवली.
मंगळवारी सकाळी अनेक दुकाने फोडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच, अणदूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नळदुर्गचे पोलीस श्वान पथकासह अणदूरमध्ये दाखल झाले पण पोलिसांना चोरट्याचा काहीच मागोवा लागला नाही. चोरटे अधिक चतुर निघाले आणि नळदुर्ग पोलीस पुन्हा एकदा तपास सुरु आहे, इतकेच उत्तर देऊन निघून गेले.
फिर्याद दाखल
फिर्यादी नामे-भिमेश विष्णु वाघमारे, वय 37 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे अंबिका ज्वेलर्स दुकान बंद करुन घरी झोपले असता अज्ञात व्यक्तीने दि. 27.05.2024 रोजी 20.01 ते दि. 28.05.2024 रोजी 06.00 वा. सु. अणदुर येथील खंडोबा मंदीराजवळ असलेले दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करुन डिस्पले रॅक व क्वॉटर उचकटून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 300 ग्रॅम चांदीचे दागिने रोख रक्कम 15,000₹ असा एकुण 1,86,000₹ किंमतीचा माल चोरु नेला. अशा मजकुराच्या भिमेश वाघमारे यांनी दि. 28.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अणदूरमधील जवळपास पाच ते सात दुकाने चोरटयांनी फोडली असली तरी फक्त एकाची फिर्याद घेण्यात आल्याने नळदुर्ग पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.