तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातून लाखो भाविक तुळजापुरात देवीचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत आहेत. काही श्रद्धाळू तर १००-१५० किलोमीटर चालत येऊन देवीचे दर्शन घेत आहेत. हे सगळं ऐकायला कितीही भाविकतेचं वाटलं तरी प्रत्यक्षात, यंदाच्या महोत्सवात भाविकांपेक्षा पोलिसांची श्रद्धा जोरात आहे – ती मात्र पैसे आणि वशिल्यावर!
देवळात दर्शनासाठी रांगेत उभं राहण्याचं महत्त्व यंदा बऱ्याच भाविकांना समजलं आहे. कारण दर्शनाच्या रांगेत बसलेल्यांना आठ-दहा तास तरी लागतात. आणि पाचशे रुपये देऊन पेड पास काढला, तरी तीन-चार तासांची परीक्षा द्यावी लागते. मात्र, पोलिसांचे नातेवाईक अशा तपश्चर्येत अडकत नाहीत! त्यांनी पेड पास घ्यायचा नाही, नियम पाळायचे नाही, थेट पाच मिनिटांत देवीचं दर्शन करून प्रसादासह परत यायचं. श्रद्धेच्या या विशेष श्रेणीचं दर्शन पाहून सामान्य भक्तांचे मन पिळवटले जात आहेत.
भाविकांच्या वेशात शहरात काही खास “श्रद्धाळू चोरटे”ही दाखल झाले आहेत. चोऱ्या इतक्या वाढल्या आहेत की, सज्जन महिला आपल्या बाजूला असल्या तरी त्यांच्याकडे संशयाने बघण्याची वेळ आली आहे. बंदोबस्तासाठी पोलिसांचा तब्बल बाराशे ते दीड हजारांचा फौजफाटा शहरात तैनात केलाय. पण या पोलिसांचा सारा वेळ शिट्या फुंकण्यात जातोय, त्यांना भाविक कोण आणि चोर कोण हेच लक्षात येत नाही.
या सगळ्याच्या मध्ये तुळजापुरात टायगर नावाचा जुगारही जोरात सुरु आहे. भर रस्त्यावर हा जुगार सुरु असतो, आणि पोलिसांनी तिथे जाऊन एक काठीही आपटलेली नाही. उलट हा टायगर जुगार त्यांच्या दररोजच्या कमाईचं साधन बनलाय. असा विचार त्यांनी पक्का केला आहे की, “आपल्या बापाचं काय जातंय?”
या सोहळ्यात काही पोलिसांनी तर चतुराईचा उच्चांक गाठला आहे. गतवर्षी छापलेले स्थानिक वाहन पास यावर्षी विकून त्यांनी मोठी कमाई केली आहे. आता या कमाईत कोणाला किती वाटा मिळाला हे सांगता येत नाही, पण यात सापडले ते चोर नाही तर शाहूच म्हणावं लागेल.
व्हीआयपी भक्तांसाठी या महोत्सवात विशेष सोयीसुविधा आहेत. त्यांना थेट दर्शन मिळतंय, इतकंच नव्हे तर त्यांची चारचाकी वाहने थेट मंदिरापर्यंत पोचवली जात आहेत. यामुळे, एका रुग्णवाहिकेला बाहेर पडण्यासाठी तब्बल एक तास लागला. या व्हीआयपी दर्शनाने तुळजापूरचा ‘व्हीआयपी यात्रा’ कार्यक्रम खऱ्या अर्थाने साजरा केला आहे.
तुळजाभवानी मंदिर समितीच्या अध्यक्षपदावर जिल्हाधिकारी साहेब विराजमान आहेत. पण यंदा साहेबांचा मूड अगदी नाराज आहे. साहेबांना एका प्रकरणामुळे एवढा त्रास झाला आहे की त्यांनी देवीच्या महोत्सवात खास लक्ष देणं सोडलं आहे. एसपी साहेब तर नवीन आले आहेत आणि त्यांना तुळजापुरातले काही माहित नाही. आल्या – आल्या नव्या एसपी साहेबानी काय केले असेल तर स्थागुशाचे पोलीस निरीक्षकांचे पंख छाटून “अर्थ” विभागाच्या पोलीस निरीक्षकावर अर्थ वसुलीची जबाबदारी दिली. कानामागून आला आणि तिखट झाला ही म्हण कानगुटेवर नक्कीच भारी पडेल ! त्यामुळे देवीला आता ‘आई राजा उदो उदो’ बरोबर पोलीस खात्याचे चांगभले म्हणण्याची वेळ आली आहे.
तुळजापूर महोत्सवात भाविकांची श्रद्धा, पोलिसांची वशिलेबाजी, आणि व्यवस्थापनाचा गोंधळ पाहून, देवीचंही मन खट्टू झालं असेल. देवीनेच आता भक्तांच्या मनातील या विशेष “श्रद्धेची” परीक्षा घ्यायला सुरुवात केलीय का असं वाटावं, कारण भाविकांसाठी आता दर्शनाच्या रांगेत उभं राहणं, चोरीपासून सावध राहणं, आणि पोलिसांच्या कर्तृत्वाचा सामना करणं हे सगळं एकच तपश्चर्या झालं आहे.