तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव सध्या जोरात सुरू आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यांमधून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येत आहेत. नवरात्र महोत्सवात तुळजाभवानीचा जयघोष आणि भाविकांच्या ‘आई राजा उदो’ च्या गजरात संपूर्ण शहर भक्तिभावाने न्हालून निघाले आहे. पण त्याचवेळी, काही पोलिसांनी या भक्तिभावाला बाजूला ठेवून लुटीचा ‘पासा’ खेळण्याचा नवा मार्ग शोधला आहे.
गर्दीतील शिस्त राखण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी तुळजापूर शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. त्या वाहनांसाठी खास रिंग रोडची सुविधा उपलब्ध आहे, आणि शहरात येण्यासाठी स्थानिक वाहन पास परवाना लागतो. आता हे पास मिळवण्याचे काम पोलिसांकडे आहे, आणि तिथेच या खेळाची खरी मजा आहे. कारण या पाससाठी पोलिस उघडपणे भाविकांना दोन -तीन हजार रुपयांचे ‘भक्तिभावाने’ योगदान देण्याचे विनंती करतात.
पण या वर्षी दोन पोलिसांनी आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा कारनामा केला आहे. या दोन बहाद्दर पोलिसांनी, म्हणजे संतोष करवर आणि किरण औताडे यांनी, २०२४ च्या महोत्सवात मागील वर्षाचे, म्हणजे २०२३ चेच पास वाटण्यास सुरुवात केली! नवीन पास तयार करण्याचे कष्ट वाचवून त्यांनी त्यांच्या कडे संग्रही असलेले मागील वर्षीचे पासच वितरित केले.
ही गोष्ट एका चाणाक्ष भाविकाच्या लक्षात आली, ज्याने या ‘स्मरणशक्ती प्रूफ’ पासांबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली. पोलिस अधीक्षकांना माहिती मिळताच, त्यांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली. मग काय, या दोन पोलिसांच्या ‘क्रिएटिव्हिटी’ ची गोष्ट सर्वत्र पसरली!
शहरात सध्या चर्चा जोरात आहे की, या दोघांना आता पोलिस अधीक्षक काय बक्षीस देणार? काही जणांनी उपहासाने सांगितलं, “अरे, या दोघांना ‘स्मरणशक्ती’ पुरस्कार द्या!” तर काहींनी म्हटलं, “देवीच्या महोत्सवात त्यांच्या सेवाभावी कामगिरीची दखल घेऊन ‘वर्षभराच्या पास’ देण्याचा विचार करा!”
तुळजापूरच्या या कारनाम्यामुळे भाविकांमध्ये मिस्कील हास्य पसरले आहे. काही भाविक तर म्हणतात, “काय हरकत आहे, यातही एक श्रद्धेचा भाग आहेच ना! या पोलिसांनी मागील वर्षाच्या भक्तीला उजाळा दिलाय!”
यामुळे, नवरात्र महोत्सवात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या अनुभवात एक नवीन किस्सा जोडला गेला आहे. त्यांच्या देवीच्या दर्शनाबरोबरच ‘पासा’च्या खेळातही लुटीचा धम्माल अनुभव येतोय!