तुळजापूर ही आदिशक्तीची पवित्र नगरी. याठिकाणी माता तुळजाभवानीच्या चरणी लाखो भाविक माथा टेकवतात. मात्र, काही बेशरम आणि नशेबाज प्रवृत्तींच्या कृतींमुळे या नगरीची बदनामी होत आहे. या अपवित्र कृत्यांमुळे तुळजापूरची प्रतिमा डागाळली आहे आणि त्यामुळे येथील तरुणांबद्दल समाजात गैरसमज पसरत आहेत.
माजी आमदार माणिकराव खपले यांचे नातू राहुल खपले यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक धक्कादायक विधान केले – “ड्रग्ज प्रकरणामुळे तुळजापूरची बदनामी झाली आहे. त्यामुळे येथील तरुणांना मुली द्यायला लोक घाबरत आहेत.” हा आरोप निश्चितच गंभीर आहे. पण त्यामुळे येथील संपूर्ण तरुणाईला दोषी मानणे कितपत योग्य आहे? धाराशिव लाइव्हने यावर ठाम भूमिका घेतली आहे – सगळेच तरुण दोषी नाहीत!
धाराशिव लाइव्हची ठाम भूमिका:
धाराशिव लाइव्हने नेहमीच वास्तव मांडले आहे. आमचे कार्य हे कुणाच्याही दबावाखाली नसते, आम्ही फक्त सत्य मांडतो. ड्रग्ज प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचा पर्दाफाश करणे ही आमची जबाबदारी आहे, आणि ती आम्ही पार पाडणारच.
मात्र काही ड्रग्ज पेडलरचे पंटर धाराशिव लाइव्हच्या फेसबुक पेजवर अश्लील आणि घाणेरड्या कमेंट करून आपली गलिच्छ वृत्ती दाखवत आहेत. अशा विकृतांना धाराशिव लाइव्ह फाट्यावर मारते! आम्ही अशा लोकांच्या दबावाला भीक घालणार नाही.
कुणाचेही मिंद्दे नाही – रोखठोक मांडणार!
धाराशिव लाइव्हने नेहमीच समाजातील घाणेरडे प्रवृत्ती उघडकीस आणल्या आहेत. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी – आम्ही कुणाचेही मिंद्दे नाही. आम्हाला खरी आणि खरीच बातमी द्यायची आहे, लोकांच्या भावनांशी खेळायचे नाही.
तुळजापूर नगरीला अपवित्र करणाऱ्यांचा आम्ही शेवटपर्यंत समाचार घेणार. सत्य मांडणे हे आमचे कर्तव्य आहे आणि कोणत्याही दबावाखाली येणार नाही. जे या पवित्र नगरीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.
आम्हाला माहित आहे की तुळजापूरची तरुणाई सज्जन, कर्तृत्ववान आणि मेहनती आहे. काही मोजक्यांमुळे संपूर्ण तरुणाईवर दोषारोप करणे ही फार मोठी अन्यायाची गोष्ट आहे. त्यामुळे या बदनामीमुळे तरुणांच्या प्रतिमेला डाग लागणार नाही, याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे.
धाराशिव लाइव्हचे एकच वचन आहे – तुळजापूरच्या पवित्रतेला धक्का देणाऱ्यांचा अंत पाहू!