धाराशिव : विधानसभा निवडणुकीचं घोंगडं उघडल्यामुळे सगळे राजकीय खेळाडू मॅचसाठी सज्ज झालेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय खेळ सुरु आहे, पण तुळजापूरमध्ये मात्र सगळ्यांच्या खेळात अनोखी चुरस रंगली आहे.
तुळजापुरात, सत्ताधारी भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार ‘मी ही होणार उमेदवार’ चा खेळ खेळतायत. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात लहान मुलांसारखी भांडणं सुरु आहेत – कोणाला खेळायला आधी जायचं, कोणाला पहिला टर्न मिळणार?
काँग्रेसकडून माजी आमदार मधुकरराव चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी “आमचीच बारी” असा दावा केला आहे, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अशोक जगदाळे, जीवनराव गोरे, आणि सक्षणा सलगर यांनीही ‘आम्ही पण’ म्हणून हात वर केले आहेत.
दरम्यान, मागील निवडणुकीत धाराशिव मतदारसंघात पराभूत झालेल्या संजय निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाला घरचा आहेर दिला. मागील निवडणुकीत पक्षाला कुणी उमेदवार मिळाला नाही म्हणून मला उभे करण्यात आले होते. माझ्या प्रचाराला कुणी आले नाही.”मला पक्षाने पाच पैसे दिले नाहीत, बकऱ्यासारखा मला बळी दिला!” अशी भावना मांडत त्यांनी तुळजापूरची उमेदवारी मागितली. पण या त्यांच्या हट्टाला पक्ष किती गंभीरतेने घेतो, हा मात्र त्यातलाच आणखी एक प्रश्न.विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय दुगावकरांनी आयोजित केली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर पत्रकारांना मटणाची पार्टी देण्यात आली, त्यामुळे मटण खाऊन ढेकर दिलेल्या पत्रकारानी फुगलेल्या पोटासारखी बातमी दिली.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यात तुळजापूर जागेवरून ” तू-तू, मै-मै” सुरू आहे. “जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही, पण वाघासारखा लढणार” अशी घोषणा देत, त्यांनी आगामी निवडणुकीच्या आखाड्यातून खूप काही अपेक्षा ठेवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या या रिंगणात कधी कोणाला पहिला चान्स मिळेल हे पाहायला जिल्ह्यातील तमाम मतदार उत्सुक आहेत!