तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावातील गट क्रमांक 176 च्या जमिनीच्या एनए लेआउट घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. धाराशिव आणि तुळजापूर तहसीलदारांनी एकाच सर्वे नंबरचा एनए लेआउट मंजूर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 73 प्लॉट्सची खरेदी 9 डिसेंबर 2024 रोजी झाली होती.
तक्रारीमुळे उघडकीस घोटाळा
अमोल जाधव यांनी 26 डिसेंबर रोजी धाराशिव तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. उपविभागीय अधिकारी श्री. डव्हळे यांनी प्राथमिक तपासादरम्यान अनेक गंभीर गैरप्रकार उघड केले. वादग्रस्त दस्त रद्द करत आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाईचे संकेत दिले.
गुन्हा दाखल; आरोपींविरुद्ध कारवाई सुरू
तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी 16 जानेवारी 2025 रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार विक्रेता पवनजित कौर गिरवरसिंग सुखमणी (वय 54, रा. औरंगाबाद) आणि खरेदीदार सतिश सोपानराव पैरणाळे (वय 58, रा. पुणे) यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोट्या सह्या व बनावट कागदपत्रांचा वापर
दोन्ही आरोपींनी बनावट कागदपत्रांचा आधार घेत एनए लेआउट मंजूर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यामागे एका लिपिकाचा हात असून त्याने अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी
सिंदफळ एनए लेआउट घोटाळ्याचा खरा मास्टरमाईंड बाहेर काढून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करून या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
हा घोटाळा उपविभागीय अधिकारी खरमाटे यांच्या काळात झाला असला तरी, खरा सूत्रधार एक लिपिक असल्याची माहिती आहे.