धाराशिव – खरीप २०२४ मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील २१ मंडळातील शेतकर्यांना मिळणार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली आहे.
जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती, त्यानुसार १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना २२१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. परंतु, धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील २४ महसूल मंडळातील शेतकरी प्रचलित निकषांमुळे मदतीपासून वंचित राहिले होते.
याबाबत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुनिष्ठ परिस्थितीचा विचार करून मदत देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या होत्या. सचिवांनी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकार्यांकडून अहवाल मागवला होता. हा अहवाल सकारात्मक असून तो सचिवांकडे सादर झाला आहे. त्यामुळे मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार पाटील यांनी सांगितले की, काही मंडळात सदोष पर्जन्यमापकांमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती. त्यामुळे २०२२ साली ओढवलेल्या आपत्तीच्या वेळी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार पाहणीचा अहवाल ग्राह्य धरून मदत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर उर्वरित महसूल मंडळांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.
आमदार पाटील यांनी स्वतः अनेक गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. त्यांच्या मते, सलग पाच दिवसांत ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. परंतु, ‘सलग पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मिलीमीटर पाऊस झाल्यास’ या निकषात न बसल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर अनुकूलता दर्शविली असून वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे तयार केलेला सकारात्मक अहवाल मदत व पुनर्वसन सचिवांकडे सादर झाल्याने मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.